नागपुरात पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:05 AM2019-02-05T00:05:04+5:302019-02-05T00:07:41+5:30
पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला (वय ४२) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर तिचे घर हडपून तिलाच धमकी देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध अखेर हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून पीडित महिला गेल्या चार वर्षांपासून पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडे पायपीट करीत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला (वय ४२) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर तिचे घर हडपून तिलाच धमकी देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध अखेर हुडकेश्वर पोलिसांनीबलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून पीडित महिला गेल्या चार वर्षांपासून पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडे पायपीट करीत होती.
राजेंद्र आनंदा मकदुम (वय ४२) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे (एपीआय) नाव असून, ते सध्या सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी ठाण्यात नियुक्त आहेत.
२०११ मध्ये एपीआय मकदुुम नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी एका नातेवाईकाने पीडित महिलेविरुद्ध तक्रार नोंदविली होती. त्याची चौकशी करण्याच्या निमित्ताने महिला आणि मकदुमची ओळख झाली. या गुन्ह्यात महिलेसोबत सहानुभूतीने वागत मकदुम तिच्या जवळ गेला. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. फेब्रुवारी २०११ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून मकदुमने तिच्यासोबत शरीरसंबंध जोडले; नंतर हे दोघे पती-पत्नीसारखे वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. २०११ ते २०१४ या कालावधीत त्यांच्यातील या संबंधाने महिलेला गर्भधारणा झाली. यावेळी मकदुमने तिला धमकावत तिचा गर्भपात करवून घेतला. त्याच दरम्यान महिलेच्या नावावर असलेले लाखोंचे घरही मकदुमने आपल्या नावावर करून घेतले; नंतर मात्र लग्नास नकार देऊन तिला वाऱ्यावर सोडले. मकदुमच्या या विश्वासघाताची तक्रार २०१४ मध्ये महिलेने हुडकेश्वर ठाण्यात केली. मात्र, प्रकरण सहायक पोलीस निरीक्षकाच्याविरोधातील असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे टाळले.
कायद्याचा असाही गैरवापर
शरीरसंबंध जोडून महिलेला वाऱ्यावर सोडणाऱ्या मकदुमने तिचे हक्काचे छतही हिरावून घेतले अन् कायद्याचा गैरवापरही केला. आपल्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी महिला धडपड करीत असल्याचे कळताच, मकदुमने त्याच महिलेविरुद्ध ती ब्लॅकमेल करीत असल्याची तक्रार नोंदविली आणि तिलाच गुन्ह्यात गोवले. तेव्हापासून पीडित महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे पायपीट करीत आहे. अखेर चार वर्षानंतरच्या तिच्या संघर्षाला यश मिळाले आणि हुडकेश्वर ठाण्यात एपीआय सावंत यांनी सोमवारी मकदुमविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी वाडीतील पोलीस अधिकाऱ्याविरुद्धही बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.