नागपुरातील फॅक्टरी स्फोटात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 16:34 IST2024-07-04T16:33:25+5:302024-07-04T16:34:27+5:30
मालकाने हलगर्जी केल्याचा ठपका : दोन कामगारांचा झाला होता मृत्यू

Case registered after six months in factory explosion in Nagpur
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जानेवारी महिन्यात उप्पलवाडी येथील बालाजी आईस फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात दोघांचा बळी गेला होता. या स्फोटात पोलिसांनी तब्बल सहा महिन्यांनंतर तेथील मालकावर गुन्हा दाखल केला आहे. मालकाच्या हलगर्जीमुळे हा स्फोट झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
आरोपी मालक विजय जुगलकिशोर शाहूची (६२, सदर) उप्पलवाडी परिसरात बालाजी आईस फॅक्टरी आहे. ६ जानेवारी रोजी तेथे अमोनिया गॅसचे प्रमाण वाढून स्फोट झाला होता. त्यामुळे परिसरातदेखील वायूची गळती झाली होती व अनेकांना त्रास झाला होता. या स्फोटात जखमी झालेल्या डुग्गरसिंग रावत (७०, राजस्थान) व खुम्मनसिंग लुम्बसिंग (४५, राजस्थान) या कामगारांचा ६ व १० जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. तर श्रावणसिंग बघेल (४४, यशोधरानगर), व राजा राजेंद्र आर्य (२३, चिचोली, मध्यप्रदेश) हे जखमी झाले होते. कपिलनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. फॅक्टरीमध्ये अमोनिया गॅसवर नियंत्रण ठेवण्याची सक्षम यंत्रणाच नसल्याची बाब पोलिसांच्या तपासातून समोर आली. पोलिसांनी मालक जुगलकिशोर शाहूविरोधात भादंविच्या कलम २८५ व ३०४(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
स्फोटामुळे परिसरात झाली होती धावाधाव
या स्फोटानंतर टाकीतील अमोनिया गॅस १०० ते १५० चौरस फूट परिसरात पसरला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यात अडचण असे त्रास होऊ लागले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने या परिसरातील उद्योगातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते. या प्रकरणात आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. मात्र सहा महिने साधा गुन्हादेखील दाखल झाला नसल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.