झाडांना खिळे ठोकून जाहिराती लावणाऱ्यांविरुद्ध होणार गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 11:21 AM2021-12-10T11:21:22+5:302021-12-10T11:23:41+5:30
शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जाहिरातदारांनी आपली जबाबदारी ओळखून तीन दिवसात आपल्या जाहिराती काढण्याबाबत आवाहन आयुक्तांनी केले आहे.
नागपूर : झाडांना खिळे ठोकून लावण्यात आलेल्या जाहिराती, पोस्टर, भित्तीपत्रे पुढील तीन दिवसात काढा, त्यानंतर ज्या जाहिरातदारांच्या जाहिराती झाडांवर दिसतील, त्यांच्यावर महापालिका पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र वीरुपन प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करणार आहे. गुरुवारी यासंदर्भात आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश दिले आहेत.
महापालिकेतर्फे नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. मुख्यत्वे रस्त्याच्या कडेला वृक्षलागवड असल्याने जाहिरातदार या झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावतात. झाडांना खिळे ठोकल्याने झाडांना इजा पोहोचून नुकसान होते. शिवाय शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचून विद्रुपीकरण होते. त्यामुळे शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जाहिरातदारांनी आपली जबाबदारी ओळखून तीन दिवसात आपल्या जाहिराती काढण्याबाबत आवाहन आयुक्तांनी केले आहे. यानंतर झाडांवर आढळणाऱ्या जाहिरातीसंदर्भात महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित जाहिरातदारांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाईल, असे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.