मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हे दाखल
By admin | Published: February 22, 2016 02:59 AM2016-02-22T02:59:03+5:302016-02-22T02:59:03+5:30
शालेय पोषण आहाराच्या नावाखाली विद्यार्थ्यांना विषाक्त खिचडी खाऊ घालण्याचे प्रकरण अनेकांवर शेकण्याचे संकेत मिळाले आहेत.
खिचडी विषबाधा प्रकरण : सर्वच विद्यार्थी सुखरूप
नागपूर / हिंगणा : शालेय पोषण आहाराच्या नावाखाली विद्यार्थ्यांना विषाक्त खिचडी खाऊ घालण्याचे प्रकरण अनेकांवर शेकण्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर, एमआयडीसी पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह तिघांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
हिंगणा रोड, राजीवनगर येथील शांतीनिकेतन उच्च प्राथमिक शाळेत शनिवारी दुपारी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली खिचडी सव्वाशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी घातक ठरली. खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. मळमळ, डोकेदुखी, ओकाऱ्या सुरू झाल्यामुळे विद्यार्थी चक्कर येऊन पडू लागले. काही बेशुद्धही पडले. त्यामुळे शाळा, पालक अन् प्रशासनही हादरले. काहींनी आपल्या पाल्यांना आजूबाजूच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. तर, सायंकाळनंतर शंभरावर विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत या गंभीर प्रकरणाची माहिती गेली. त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या औषधोपचाराची सोय करून देण्याचे आदेश दिले. माहिती कळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हा प्रशासनातील अनेक वरिष्ठांनी रुग्णालयात धाव घेतली. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी विद्यार्थी, पालक, शाळेचे शिक्षक अन् कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली.
शिक्षण विभागातर्फे चौकशी
नागपूर : माध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेने शनिवारी उपराजधानीत खळबळ उडाली. शांतिनिकेतन विद्यालयातील १३० विद्यार्थ्यांवर मेडिकलमध्ये उपचार करण्यात आले. यातील ३९ विद्यार्थ्यांना शनिवारी रात्रीच सुटी देण्यात आली तर उर्वरित ९१ विद्यार्थ्यांना सकाळी घरी पाठविण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार रविवारी शिक्षण व पोषण आहार विभागातर्फे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शाळेत संतप्त पालक व नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु एमआयडीसी पोलिसांनी सावध भूमिका घेत परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी मुख्याध्यापक गंगाधर काळमेघ व पोषण आहार शिजविणारे निरंजन बरवडकर, सोनुला मेश्राम यांना पोलीस ठाण्यात उपस्थित केले होते.
अफवांमुळे वाढली रुग्णांची संख्या
खिचडी खाल्ल्यानंतर शाळेतच १२ ते १४ मुलांनी उलट्या केल्या. काहींच्या पोटात दुखत असल्याचे, मळमळ वाटत असल्याचे, डोके दुखत असल्याच्या तक्रारी होत्या. परंतु खिचडी खाताना कुणाच्याच ताटात किंवा गंजात पाल आढळली नाही. मात्र, याची अफवाच जास्त पसरल्याने ज्या मुलांना बरे वाटत होते त्यांनाही मेडिकलमध्ये रात्री ११ वाजेपर्यंत उपचारासाठी आणण्यात आले होते. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गर्दी झाल्याने रुग्णालयात गोंधळ उडाला होता.
युवक काँग्रेसतर्फे निदर्शने
शालेय पोषण आहारातील विषबाधेला जबाबदार कोण, या प्रश्नाला घेऊन नागपूर लोकसभा युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी सकाळी मेडिकलसमोर नारे-निदर्शने करण्यात आली. अध्यक्ष बंटी शेळके यांच्या मार्गदर्शनात शिष्टमंडळ मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनाही भेटले. यावेळी महासचिव कुणाल पुरी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नमुने पाठविले तपासणीसाठी
रविवारी सकाळच्या सुमारास शिक्षण व पोषण आहार विभागातर्फे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ममता सोनसरे व त्यांच्या पथकाने शांतिनिकेतन विद्यालयास भेट दिली. या चमूने स्वयंपाकगृहाची पाहणी केली. पाण्याच्या टाकीचेही निरीक्षण केले. खिचडीचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठविले. अशी माहिती, पोषण आहार अधीक्षक किरण चिनकुरे यांनी दिली. दरम्यान, रविवारी गटशिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, शिक्षण विस्तार अधिकारी वारकरी शालिनी, केंद्र प्रमुख कल्पना दुरुगकर, पोषण आहार अधीक्षक चिनकुरे आदींनी शाळेला भेट देऊन धान्य सामुग्री व इतर बाबी तपासल्या. याबाबत चौकशी समितीने शाळा व्यवस्थापनाला शाळेत पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसविण्यात यावे, शिल्लक अन्न-धान्यसाठा झाकून ठेवावा, स्वयंपाकगृहाची स्वच्छता ठेवावी आदी सूचना केल्या.