सव्वाचार हजार अवैध वेंडर्सविरुद्ध गुन्हे दाखल; मध्य रेल्वेकडून ९७५ फूड स्टॉल्सवर छापे
By नरेश डोंगरे | Updated: April 4, 2025 21:40 IST2025-04-04T21:39:51+5:302025-04-04T21:40:04+5:30
गेल्यावर्षी बल्लारशाह आणि नागपूर रेल्वे स्थानकाच्या फूड स्टॉलवरून विकण्यात आलेल्या खाद्य पदार्थांमुळे अनेकांना विषबाधा झाली होती.

सव्वाचार हजार अवैध वेंडर्सविरुद्ध गुन्हे दाखल; मध्य रेल्वेकडून ९७५ फूड स्टॉल्सवर छापे
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षभरापूर्वी रेल्वे स्थानकावरून दूषित खाद्यान्न विकल्या गेल्याचे प्रकरण सर्वत्र गाजल्याचे ध्यानात ठेवून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेच्या खान-पान (कॅटरिंग) विभाग तसेच अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर विशेष नजर रोखली. या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षभरात सव्वाचार हजार अवैध खाद्य पदार्थ विकणाऱ्या (व्हेंडर्स)विरुद्ध कारवाई करण्यात आली.
गेल्यावर्षी बल्लारशाह आणि नागपूर रेल्वे स्थानकाच्या फूड स्टॉलवरून विकण्यात आलेल्या खाद्य पदार्थांमुळे अनेकांना विषबाधा झाली होती. प्रवाशांनी त्या संबंधाने थेट दिल्लीपर्यंत तक्रारी केल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले होते. तेव्हापासून वाणिज्य विभागाने कॅटरिंगवर विशेष लक्ष केंद्रित केले. नागपूर विभागात येणाऱ्या विविध ठिकाणच्या रेल्वे स्थानकांवरील ९७५ फूड स्टॉल्सवर छापे घालून त्यांचे निरीक्षण करण्यात आले. धावत्या रेल्वेत खान-पान सेवा देणाऱ्या ८३२ मोबाइल कॅटरिंगची तपासणी करून त्यांना दर्जेदार खाद्य पदार्थ विकण्यास बजावण्यात आले. अनधिकृतपणे रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये खाद्य आणि पेय विकणाऱ्या ४,२३५ वेंडर्सला पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे चांगले परिणाम समोर आले.
मार्च मध्ये ५७.२५ लाखांचे उत्पन्न
गेल्या वर्षभरात रेल्वेला कॅटरिंगमधून ९ कोटी, ५७ लाखांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत हे उत्पन्न ५९ टक्के जास्त आहे. एकट्या मार्च २०२५ मध्ये कॅटरिंगची कमाई ५७ लाख २५ हजारांची आहे. गेल्या वर्षी ठरविलेल्या उत्पन्नाच्या टार्गेटपेक्षा हे ९ टक्के जास्त आहे.
नवीन करारातून ९.४५ कोटी
यंदा नागपूर विभागातील सात रेल्वे स्थानकांना प्रतिष्ठित 'ईट राइट स्टेशन' प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. उच्च दर्जाची खानपान सेवा आणि स्वच्छतेसाठी हे प्रमाणपत्र दिल्या जाते. याशिवाय यावर्षी खानपान सेवे संबंधाने रेल्वेने १९ नवीन करार केले आहेत. त्यातूनही ९.४५ कोटी रुपये रेल्वेच्या तिजोरीत जमा होणार आहे.