बुकीकडे सापडली ₹१८ कोटींची रोकड! ऑनलाइन गेमचा विळखा : १५ किलो सोने, २०० किलो चांदी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 05:50 AM2023-07-23T05:50:43+5:302023-07-23T05:51:01+5:30
नागपूर पोलिसांनी आरोपीच्या गोंदियातील घरात धाड टाकून १८ कोटी रोख, १५ किलो सोने आणि २०० किलो चांदी जप्त केली.
नागपूर/गोंदिया : ‘ऑनलाइन गेमींग’च्या तीन पत्ती, रमी आणि कसिनो अशा गेममध्ये पैसे लावल्यास दररोज लाखोंचा फायदा करून देण्याचे आमिष दाखवून गोंदियातील एका आरोपीने आपल्या नागपुरातील व्यापारी मित्राची ५८ कोटी रुपयांनी फसवणूक केली. यात आरोपीने बनावट लिंक पाठवून स्वत:च कोट्यवधींची रक्कम हडपली. नागपूर पोलिसांनी आरोपीच्या गोंदियातील घरात धाड टाकून १८ कोटी रोख, १५ किलो सोने आणि २०० किलो चांदी जप्त केली.
अनंत उर्फ सोन्टू नवरतन जैन (रा. गोंदिया) असे गुन्हा दाखल झालेल्या बुकीचे नाव आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
अशी झाली फसवणूक
२०२१ मध्ये पीडित व्यापाऱ्याने गेममध्ये पाच लाख रुपये लावले. त्याला काही तासातच आठ लाख रुपये मिळाले. जैनने मित्राला जास्त रक्कम लावण्यास प्रोत्साहित केले. ५ ते १० लाख रुपये लावल्यास लगेच १५ ते १८ लाख रुपये मिळत होते. तर १ कोटींची रक्कम लावल्यास ऑनलाइन गेममध्ये हरवून पैसे उकळले जात होते. कारवाईची कुणकुण लागताच आरोपी अनंत जैन पळून दुबईत गेल्याची चर्चा आहे.
अनंतचा कापड व्यवसाय आहे. व्यापाऱ्याने त्याला आठ लाख रु. पाठविले. त्यानंतर एका लिंकच्या माध्यमातून खाते उघडले. खात्यात आठ लाख रुपये दिसल्यामुळे व्यापारी जुगार खेळायला लागला. सुरुवातीला जिंकल्यानंतर ताे ५८ कोटी रुपये हरला. त्यामुळे त्याला शंका आली.