कॅशलेस आरोग्य योजना शिक्षकांना लागू करणार

By Admin | Published: September 10, 2016 02:27 AM2016-09-10T02:27:41+5:302016-09-10T02:27:41+5:30

पोलिसांप्रमाणे शिक्षकांनाही कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी, अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून शिक्षकांची आहे.

Cashless health plans will apply to teachers | कॅशलेस आरोग्य योजना शिक्षकांना लागू करणार

कॅशलेस आरोग्य योजना शिक्षकांना लागू करणार

googlenewsNext

शिक्षण आयुक्त : समायोजनासंदर्भात बोलणे टाळले
नागपूर : पोलिसांप्रमाणे शिक्षकांनाही कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी, अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून शिक्षकांची आहे. येत्या दोन महिन्यांत कॅशलेस आरोग्य कुटुंब योजना शिक्षकांनाही लागू करण्याचे आश्वासन शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी दिले.
शिक्षकांच्या विभागीय कार्यशाळेसाठी धीरजकुमार नागपुरात आले असता, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने त्यांना नागपूर विमानतळावर निवेदन देण्यात आले. शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांना एखादा दुर्धर आजार झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत शस्त्रक्रिया करायची असल्यास, शिक्षकांना स्वत: खर्च करावा लागतो. झालेल्या सर्व खर्चाचे बिल व तपशील जोडून परताव्यासाठी शिक्षण विभागाकडे पाठवावा लागतो. आरोग्यावर झालेल्या खर्चाचा परतावा मिळण्यासाठी शिक्षकांना बराच कालावधी लागतो. इच्छा नसताना लाचही द्यावी लागते. शिक्षकांना त्यासाठी बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना सुरू करावी, अशी शिक्षकांची मागणी आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघातर्फे सरकारला वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे. या मागणीला घेऊन संघाचे विभागीय अध्यक्ष खेमराज खोडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्याशी नागपूर विमानतळावर भेट घेतली. त्यांच्याशी आरोग्य योजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यांनी येत्या दोन महिन्यात कॅशलेस आरोग्य योजना शिक्षकांना लागू करणार असल्याचे आश्वासन दिले. परंतु सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चेत असलेला अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या विषयावर फारसे बोलणे टाळले. यावेळी संघाचे नरेश भोयर, मो. आदिल शेख, ज्ञानेश्वर चंदनखेडे, ओमप्रकाश ढाबेकर, देवेंद्र सोनटक्के, प्रवीण आंभोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

१४ सप्टेंबरपर्यंत समायोजनाची
प्रक्रिया होणार असल्याची चर्चा
गेल्या दोन दिवसांपासून शिक्षकांच्या समायोजनाची संपूर्ण प्रक्रिया ठप्प आहे. नागपुरात १० व ११ सप्टेंबर या दोन दिवसात विभागीय शैक्षणिक कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला शिक्षण आयुक्त धीरजकुमार, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे उपस्थित राहणार आहेत. समायोजनाच्या विषयावरून कार्यशाळेत शिक्षकांकडून कुठलाही त्रागा होऊ नये म्हणून १४ सप्टेंबरपर्यंत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होईल अशी चर्चा व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू आहे. परंतु अधिकाऱ्यांकडून याला दुजोरा मिळालेला नाही.

Web Title: Cashless health plans will apply to teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.