जात जनगणनेचा उपयोग विकासासाठी व्हावा : संघ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 07:15 AM2023-12-22T07:15:53+5:302023-12-22T07:16:00+5:30
समरसतेला धक्का नको : प्रचार प्रमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेर याबाबत ठोस भूमिका मांडली आहे. जातनिहाय जनगणनेतून समाजाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. मात्र, असे करत असताना देशातील सामाजिक सद्भाव, अखंडता व सामाजिक समरसतेला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
दोन दिवस अगोदर हिवाळी अधिवेशनानिमित्त रेशीम बागेत भाजप व शिवसेनेच्या आमदारांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर बोलताना विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी जातीव्यवस्था कालबाह्य आहे. जर जनगणनेमुळे विषमता व तेढ वाढत असेल तर त्याची गरज नाही. समाजात सामाजिक समरसता वाढली पाहिजे यावरच भर द्यायला हवा, असे म्हटले होते. यावरून काही राजकीय पक्षांनी संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे अशी भूमिका मांडली होती. देशातील काही राज्यांत यावरून विविध दावे-प्रतिदावे करण्यात येत असताना अखेर आंबेकर यांनी संघाची अधिकृत भूमिका मांडली.
दुबळ्या घटकांचे व्हावे सशक्तीकरण
nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारचा भेदभाव व विषमतापासून मुक्त तसेच समरसता व सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजाला डोळ्यासमोर ठेवून काम
करत आहे.
nविविध ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक घटक आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिले. त्यांचा विकास आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने विविध शासनाकडून वेळोवेळी अनेक योजना राबविण्यात येत आहेत व संघाचे या पुढाकाराला समर्थन आहे.
nमागील काही काळापासून जातनिहाय जनगणनेची चर्चा परत सुरू झाली आहे. मात्र याचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झाला पाहिजे, असे संघाचे स्पष्ट मत असल्याची भूमिका आंबेकर यांनी मांडली.