जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
By योगेश पांडे | Published: October 10, 2024 11:47 PM2024-10-10T23:47:46+5:302024-10-11T00:07:55+5:30
मूळ कॅडरच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्याची सूचना.
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने भाजपकडून मायक्रो लेव्हलवर नियोजन करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भाजपच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील १२ मतदारसंघातील नियोजन व तेथील सामाजिक समीकरणांच्या दृष्टीने संघाकडून जाणून घेण्यात आले. भाजपकडून दुर्लक्ष करण्यात येत असलेल्या काही बाबींवर यावेळी संघाकडून कान टोचण्यात आले. विशेषत: राज्यात जातीय समीकरणांचे गणित जुळविणे तर बरोबर आहे, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका अशी सूचना यावेळी करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्या मार्गदर्शनात ही बैठक झाली. यात संघाशी जुळलेल्या काही संस्थांचे पदाधिकारी व भाजपचे जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. भाजपमध्ये तिकीट कुणाला द्यावे तो तुमचा प्रश्न आहे. मात्र मूळ कॅडरच्या कार्यकर्त्यांकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. त्यांनी पक्षाला इथपर्यंत आणले आहे याचा विसर पडू देऊ नका असे लिमये यांनी सांगितले. यावेळी संघाकडून जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांतील सामाजिक समीकरणांचा आढावा घेण्यात आला. अनेक कार्यकर्ते लोकसभेत गाफील राहिले. त्यांना सक्रियपणे कामाला लावा. तसेच सोशल माध्यमांवर केवळ लाईक करून चालणार नाही. त्यावर कार्यकर्त्यांनी व्यक्त व्हायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधकांकडून आरक्षणावरून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अशा विषयांना तथ्यांवर आधारित उत्तरे देत जनतेतील संभ्रम दूर करण्यावर भर द्यावा, अशी सूचना संघाकडून करण्यात आली.
मताधिक्य असलेल्या बुथवरील मतदान टक्का वाढवा
लोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होते, तेथील मतदानाची टक्केवारी ४० ते ४५ टक्के इतकी होती. तर जिथे भाजपला मताधिक्य नव्हते तेथे मतदानाचा टक्के ६० टक्का दिसून येत होता. प्रभाव असलेल्या भागातील लोक हव्या त्या प्रमाणात बाहेर निघाले नाही किंवा भाजपला त्यांना मतदानकेंद्रांपर्यंत नेता आले नाही. मताधिक्य असलेल्या बुथवरील मतदान टक्का वाढवा व तो ६० टक्क्यांवर न्या असे गणितच संघाकडून मांडण्यात आले.