‘जात’ आता जागतिक चिंतेचा विषय : धनराज डाहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:50 AM2019-03-01T00:50:10+5:302019-03-01T00:52:00+5:30
जातीचा संदर्भ हा व्यक्तिगत नसून तो, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीयसुद्धा आहे. या देशातील सर्व प्रश्नांचा संदर्भ हा जातीशी आहे. देशात जात पाळणारी जी व्यक्ती विदेशात गेली, तिथे सुद्धा जातीचे जंतू घेऊन गेली. त्यामुळे जात आता राष्ट्रीय विषय राहीला नसून तो जागतिक चिंतेचा विषय झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. धनराज डाहाट यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जातीचा संदर्भ हा व्यक्तिगत नसून तो, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीयसुद्धा आहे. या देशातील सर्व प्रश्नांचा संदर्भ हा जातीशी आहे. देशात जात पाळणारी जी व्यक्ती विदेशात गेली, तिथे सुद्धा जातीचे जंतू घेऊन गेली. त्यामुळे जात आता राष्ट्रीय विषय राहीला नसून तो जागतिक चिंतेचा विषय झाला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. धनराज डाहाट यांनी येथे केले.
मुक्तिवाहिनी आणि रिपब्लिकन मुव्हमेंट यांच्या संयुक्त अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजनिर्मितीचे प्रथम मुखपत्र मूकनायक’ शताब्दी समारोह अंतर्गत गुरुवारी डॉ. आंबेडकर सभागृह उरुवेला कॉलनी येथे डॉ. धनराज डाहाट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी ‘जाती अंताचे वर्तमान संदर्भ’ या विषयावर बोलताना डॉ. डाहाट म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय जाती विषयावर खरे संशोधन होऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेबांनी जाती संदर्भात मूलभूत विचार मांडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात की, ‘जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारू शकत नाही. राष्ट्र, नैतिकता उभारू शकत नाही उभारण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तडे जातील. जातीच्या प्रश्नातून काहीही साध्य होणार नाही, असेही बाबासाहेब स्पष्ट करतात. जातीच्या प्रश्नाला बाबासाहेब हे बुद्ध तत्त्वज्ञानातून पाहतात. त्यामुळेच त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. धर्मांतराबाबत बाबासाहेब म्हणतात की, जीवनाच्या मूलभूत जाणिवांमध्ये बदल, मूल्यांमध्ये बदल, विचारसरणी व दृष्टिकोनात संपूर्ण बदल म्हणजे धर्मांतरण होय.धर्मांतर हा शब्द योग्य वाटत नसेल तर नवजीवन असेही त्याला म्हणता येईल. याचा प्रत्यय धम्मदीक्षा सोहळ्यात घेतलेल्या २१ व्या प्रतिज्ञेत स्पष्टपणे दिसून येतो, असेही डॉ. डाहाट यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
नरेंद्र शेलार यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाची भूमिका विषद केली. संचालन का.रा. वालदेकर यांनी केले.
यावेळी नरेश वाहाणे, एन.एल. नाईक, दादाकांत धनविजय, राहुल दहीकर, दिलीप सूर्यवंशी, प्राचार्य भाऊ वासनिक, डॉ. विनोद डोंगरे, संजय गोडघाटे, सेवक लव्हात्रे, श्रीराम बन्सोड, धर्मराज निमसरकर, शिवचरण थूल, नलिनी डहाट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.