प्राथमिक केंद्रांमध्ये व्हावेत हृदयरुग्णांवर आकस्मिक उपचार
By admin | Published: September 29, 2014 01:02 AM2014-09-29T01:02:59+5:302014-09-29T01:02:59+5:30
बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकाराचा झटका आलेल्यांवर उपचारच होत नाही. रुग्णाला मोठ्या इस्पितळाकडे पाठविले जाते. परिणामी २५ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. देशात वाढत्या
विदर्भ हृदयरोग संघटनेचा पदग्रहण सोहळा थाटात
नागपूर : बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकाराचा झटका आलेल्यांवर उपचारच होत नाही. रुग्णाला मोठ्या इस्पितळाकडे पाठविले जाते. परिणामी २५ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. देशात वाढत्या हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मिक सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ (दिल्ली) डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी येथे केले.
डॉ. के.जी. देशपांडे स्मृती व्याख्यान व विदर्भ हृदयरोग संघटनेचा पदग्रहण सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. रेड्डी म्हणाले, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांमधील ७० टक्के लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो. हृदयरोगापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तंबाखुचे व्यसन, धूम्रपान, स्थूलतेचे प्रमाण या बाबी टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर उच्च रक्तदाब, शरीरातील चरबीचे प्रमाण, मधुमेह आदी बाबींवर नियंत्रण राखले पाहिजे. त्यासाठी नियमित व्यायाम, नियंत्रित वजन, पोषक जीवनशैली करत राहिलो तर औषधे घ्यावी लागणार नाहीत. परंतु सध्याच्या घडीला जोपर्यंत आजार होत नाही तो पर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दुसरीकडे देशात हृदयरोगाच्या आकस्मिक सेवेचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यात महत्त्वाचे निर्णय होणे आवश्यक आहे. हृदयरोगाचे रुग्ण कमी करण्यासाठी गावपातळीवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि आशा वर्कस यांच्याकडून हृदयरोगाप्रति जनजागृती होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया, विदर्भ शाखेचा सत्र २०१४-१५ साठी पदग्रहण सोहळा थाटात पार पडला. नवनियुक्त अध्यक्ष डॉ. शंतनू सेनगुप्ता, सचिव डॉ. पवन अग्रवाल यांनी शपथ घेतली. यावेळी मंचावर डॉ. रेड्डी, मुंबईचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. भरत दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. (प्रतिनिधी)