विदर्भात पहिल्यांदा अनाेखा ‘कॅट शाे’; रशिया, जर्मनी, अमेरिकेच्या मांजरी येणार नागपुरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 03:20 PM2022-03-07T15:20:25+5:302022-03-07T15:31:03+5:30
भारतीय क्रिकेट खेळाडू युसूफ पठाण तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत 'कॅट शाे'चे उद्घाटन हाेणार आहे.
शाहनवाज आलम
नागपूर :विदर्भात पहिल्यांदा अनाेख्या ‘कॅट शाे’चे (Cat Show) आयाेजन करण्यात आले आहे. यामध्ये देशविदेशातील विविध प्रजातींच्या मांजरी लक्ष वेधणार आहेत. यामध्ये अमेरिकेतील मेनेकुन प्रजातीच्या मांजरीसह रशिया व जर्मनीच्या मांजरीही लक्ष वेधून घेतील. मांजरप्रेमींसाठी हा शाे पर्वणी ठरणार आहे.
१३ मार्चला फंक्शन जंक्शन हाॅल, काटाेल नाका चाैक येथे कॅट शाेचे आयाेजन केले जाणार आहे. यामध्ये भारतीय मांजरीसह पर्शियन, सीमेस, बर्मेस, मग्नाेलियन आदी प्रजातीच्या मांजरी बघायला मिळतील. भारतीय क्रिकेट खेळाडू युसूफ पठाण तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत कॅट शाेचे उद्घाटन हाेणार आहे. अमेरिकेतील मेनेकुन प्रजातीची मांजर आकर्षणाचे केंद्र असेल. ही मांजर सामान्य मांजरीपेक्षा माेठी असते. तिची लांबी लेब्राडाॅर श्वानासारखी असते आणि वजन जवळपास ११ ते १२ किलाे असते. रशिया आणि जर्मनीच्या मांजरींचाही या शाेमध्ये समावेश असेल. शाेचे परीक्षक म्हणून वर्ल्ड कॅट फेडरेशनचे (World Cat Federation) सुधाकर काटीकिनेनी व आंतरराष्ट्रीय जज डाॅ. प्रदीप सहभागी हाेणार आहेत. विदर्भात पहिल्यांदा अशाप्रकारे कॅट शाे आयाेजित हाेत असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
१२० मांजरी शाेमध्ये येणार
विदर्भ कॅट क्लबतर्फे आयाेजित या शाेमध्ये एकूण १२० पिंजरे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवेशही मर्यादित आहे. आतापर्यंत महाराष्ट्रासह हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई व देशातील इतर शहरांमधून प्रवेश आले आहेत. शाेदरम्यान मांजरींना ब्रीड प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. मांजरींची नि:शुल्क आराेग्य तपासणी व लसीकरणही करण्यात येईल.
विदेशात हाेत नाही भारतीय मांजरींची निर्यात
संस्थेचे अध्यक्ष अजीम खान यांनी सांगितले, मागील काही वर्षात मांजरी पाळण्याचा ट्रेंड वाढला आहे. परदेशी मांजरींचे आकर्षण अधिक आहे. देशात विदेशी मांजरींची आयात हाेते पण भारतीय मांजरींची निर्यात हाेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भारतीय मांजरीही सुंदर आणि आकर्षक असतात. शाेमध्ये भारतातील सर्व प्रजातींच्या मांजरींचा समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.