चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ‘कॅट’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 06:00 AM2019-08-22T06:00:00+5:302019-08-22T06:00:05+5:30

सणासुदीत भारतात विक्रीस येणाऱ्या सर्व चिनी वस्तूंची देशात विक्री न करण्याचे आवाहन देशातील ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यापाऱ्यांना आणि खरेदीवर प्रतिबंध आणण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात येणार आहे.

'Cat' warning to boycott Chinese products | चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ‘कॅट’चा इशारा

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ‘कॅट’चा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्दे२९ ऑगस्टला दिल्लीत बैठकभारतीय उद्योजक व ग्राहकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाकिस्तानच्या समर्थनात उतरलेल्या चीनमधील उत्पादनांवर १ सप्टेंबर २०१९ पासून बहिष्कार घालण्याचा इशारा कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) दिला आहे. या संदर्भात सर्व राज्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २९ ऑगस्ट रोजी दिल्लीत बोलविल्याची माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी दिली. देशात ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यावसायिक असल्याचे त्यांनी सांगितले.
काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सर्व राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिला, मात्र चीनने पाकिस्तानला समर्थन दिले. त्यामुळे सणासुदीत भारतात विक्रीस येणाऱ्या सर्व चिनी वस्तूंची देशात विक्री न करण्याचे आवाहन देशातील ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यापाऱ्यांना आणि खरेदीवर प्रतिबंध आणण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात येणार आहे. या संदर्भात कॅटच्या देशभरातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक २९ ऑगस्टला दिल्लीत होणार आहे. बैठकीनंतर १ सप्टेंबरपासून चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला जाईल, असे भरतीया म्हणाले. चीनऐवजी भारताने बांगला देशासारख्या लहान आणि कमी विकसित देशांशी व्यवहार वाढविले पाहिजे, असे आवाहन बैठकीत करण्यात येणार आहे.
चीनची सर्वात मोठी बाजारपेठ भारतात आहे. देशात सन २०१७-१८ मध्ये चीनहून ९० बिलियन डॉलर्सच्या वस्तूंची आयात झाली होती. आता मात्र चीनचा व्यापार धोक्यात सापडला आहे. आपली अर्थव्यवस्था भारतावर अवलंबून असतानाही चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहात आहे. त्यामुळे भारतीयांनी चीनला धडा शिकवावा, असे आवाहन भरतीया यांनी केले.
चीनमध्ये निर्मित वस्तूंवर भारताने ३०० ते ५०० टक्के आयात शुल्क लावावे. त्यामुळे चीनच्या वस्तू भारतात येणार नाहीत. चीनमधून ज्या वस्तू आयात करण्यात येतात, त्या वस्तू भारतातच तयार करण्यासाठी भारतीय उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे. विविध खेळणी निर्मितीसाठी लघु उद्योजकांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. घरगुती वापरातील स्वस्त आणि गुणवत्ता नसलेल्या वस्तू भारतात येतात याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे भरतीया यांनी सांगितले.

Web Title: 'Cat' warning to boycott Chinese products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार