खेकडे पकडणे जीवावर बेतले: मामा-भाच्याचा करंटने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 08:33 PM2018-11-28T20:33:34+5:302018-11-28T20:41:24+5:30
हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथील खडकी येथील मामा-भाच्याचा सोमवारी रात्री करंट लागून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. ते खडकी गावालगतच्या नाल्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (वानाडोंगरी) : हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथील खडकी येथील मामा-भाच्याचा सोमवारी रात्री करंट लागून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. उमेश दयाराम मरसकोल्हे (३०) व सागर विनोद आत्राम (१५) अशी मृतांची नावे आहे.
उमेश आणि सागर हे दोघे मामा भाचे सोमवारी रात्री ८ वाजता खडकी गावालगतच्या नाल्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते. मात्र ते घरी परत आले नसल्याने उमेशची आई फुलाबाई मरसकोल्हे हिने हिंगणा पोलीस ठाण्यात दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारावर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अरविंद घिये व पोलीस शिपाई सुधाकर धुर्वे यांनी नाल्याच्या आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. बुधवार दुपारी ३ वाजताच्या सुमारास एका शेतातील कापसाच्या पिकात दोघांचे मृतदेह आढळून आले. शेतातील कुंपणावर सोडण्यात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्यांचा करंट लागून मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र घटनास्थळ आणि नाल्याचे अंतर पाहता याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला नसावा असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
हिंगणा तालुक्यात वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला आहे. यामुळे पिकांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी शेतकरी रात्री शेताच्या कुंपणावर विद्युत प्रवाह सोडतात. त्यामुळे नेमका कुणाच्या शेतात या मामा-भाच्याचा मृत्यू झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पाठविले आहे.