‘कॅट’चा भारत बंद : आज कोट्यवधींचा व्यवसाय होणार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 09:47 PM2018-09-27T21:47:41+5:302018-09-27T21:48:35+5:30
कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतात विदेशी गुंतवणूक आणि वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला केंद्र सरकारने मान्यता दिल्याच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. बंदला देशातील सर्व व्यापारी संघटनांनी समर्थन दिले आहे. कॅटच्या आवाहनार्थ २८ सप्टेंबरला नागपुरातील सर्व प्रमुख बाजारपेठा बंद राहणार असून त्यामुळे कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतात विदेशी गुंतवणूक आणि वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला केंद्र सरकारने मान्यता दिल्याच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. बंदला देशातील सर्व व्यापारी संघटनांनी समर्थन दिले आहे. कॅटच्या आवाहनार्थ २८ सप्टेंबरला नागपुरातील सर्व प्रमुख बाजारपेठा बंद राहणार असून त्यामुळे कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प होणार आहे.
विदर्भातील व्यापारी संघटनांची शिखर संघटना नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सने बंदला समर्थन दिले आहे. चेंबरशी विदर्भातील १०० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांच्या संघटना जुळल्या आहेत. या सर्व संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय औषधांच्या आॅनलाईन विक्रीच्या विरोधात अखिल भारतीय फार्मसी संघटनेच्या आवाहनानुसार २८ सप्टेंबरला देशातील सर्व फार्मसी बंद राहणार आहेत. तसेच विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने संपाला समर्थन देताना दुपारी १२ ते ४ या वेळात पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बंददरम्यान नागपुरातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य शहरात फिरून केंद्र सरकारच्या धोरणाचा विरोध करणार आहेत. याशिवाय रोड मार्च काढून व्यापारी पंतप्रधानांच्या नावाने जिल्हाधिकाºयांना निवेदन देणार आहेत. ‘कॅट’ने दिल्लीहून काढलेली संपूर्ण क्रांती रथयात्रा नागपुरात फिरून नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या प्रांगणात सायंकाळी पोहोचली. यावेळी कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया आणि एनव्हीसीसीचे अध्यक्ष हेमंत गांधी यांच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात नारे-निदर्शने केली. यावेळी १०० पेक्षा जास्त व्यापारी उपस्थित होते. ही रथयात्रा ९० दिवसात संपूर्ण भारतात फिरून व्यापाऱ्यांना विदेशी गुंतवणुकीविरोधात जागरूक करणार आहे.