गुरांच्या वाहतुकीचे पिकअप वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:06+5:302021-09-09T04:13:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : कामठी (जुनी) पाेलीस पथकाने कमसरी बाजार परिसरात केलेल्या कारवाईत गुरांच्या अवैध वाहतुकीचे पिकअप वाहन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कामठी (जुनी) पाेलीस पथकाने कमसरी बाजार परिसरात केलेल्या कारवाईत गुरांच्या अवैध वाहतुकीचे पिकअप वाहन पकडले. यात सहा जनावरांची सुटका करीत १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईदरम्यान आराेपी वाहनचालक पसार झाला. ही कारवाई मंगळवारी (दि.७) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
कामठी (जुनी) पाेलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना त्यांना कामठीतील अवैध कत्तलखान्यात गुरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची गुप्त सूचना मिळाली. त्याआधारे त्यांनी कमसरी बाजार परिसरातील बगीचाजवळ पाळत ठेवली हाेती. दरम्यान, एमएच-३१/एपी-१०७३ क्रमांकाचे पिकअप वाहन थांबवून पाेलिसांनी तपासणी केली असता, त्यात सहा जनावरांना काेंबली असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेत आराेपी पिकअप वाहनचालकाने तेथून पळ काढला. ही गुरांची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी सर्व जनावरांची सुटका करीत पिकअप वाहन जप्त केले. या कारवाईत ९० हजार रुपयांची सहा जनावरे व ६५ हजार रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाेलिसांनी सर्व जनावरांना नवीन कामठीतील गाेरक्षण केंद्रात सुरक्षित पाठविले.
याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी आराेपी वाहनचालकाविरुद्ध कलम ११ (१)(ड) प्राण्यांना निर्दयतेने वागणूक अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त नीलोत्पल, सहायक पोलीस उपायुक्त राहुल पंडित यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राहुल शिरे, पाेलीस हवालदार संजय गीते, प्रशांत सलाम, पवन गजभिये, अंकुश गजभिये, मनीष बन यांच्या पथकाने केली.