नंबरप्लेट नसल्यामुळे पकडले अन आरोपी सराईत वाहनचोर निघाले
By योगेश पांडे | Published: April 7, 2024 06:14 PM2024-04-07T18:14:07+5:302024-04-07T18:14:46+5:30
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
नागपूर : विना नंबरप्लेटच्या दुचाक्या चालविणाऱ्या दोन आरोपींना संशयावरून पकडले असता त्यांच्या ताब्यातून शस्त्र जप्त करण्यात आले. तसेच चौकशीदरम्यान आरोपी सराईत वाहनचोर असल्याची बाब समोर आली. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
५ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक गस्तीवर असताना म्हाडा चौक ते टायर चौक या मार्गावर बिना नंबर प्लेटची मोपेड व मोटारसायकलवर संशयास्पद तरुण फिरत असल्याची बाब कळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अडविले. मोपेडवर मंथन राजेंद्र ठाकरे (२३, रंगुबाजीरावनगर) हा होता तर मोटारसायकलवर अचल संतकुमार सराठे (२०, सावनेर) हा होता. त्यांच्या दुचाकीची झडती घेतली असता मोपेडमध्ये सत्तूर सापडला. दोघांचीही वाहने जप्त करण्यात आली. त्यांच्याकडे वाहनांची कागदपत्रे नव्हती व ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. चौकशीदरम्यान अचलने नागपूर ग्रामीण हद्दीतून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने आणखी दोन मोटारसायकलदेखील चोरल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून ती वाहनेदेखील जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आकरे, गणेश बरडे, आसीफ शेख, संजू भूषनम, प्रवीण ईवनाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.