एका गुन्ह्यात पकडले, निघाला आणखी सहा चोरी-घरफोडीतील आरोपी
By योगेश पांडे | Published: July 12, 2024 03:18 PM2024-07-12T15:18:40+5:302024-07-12T15:19:44+5:30
Nagpur : गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोन पथकाची कारवाई
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस मुख्यालयातील मैदानातून गाडी चोरी गेल्याच्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीतून आणखी सहा वाहनचोरी व घरफोडीची बाब समोर आली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ही कारवाई केली.
४ एप्रिल रोजी श्वेता देशभ्रतार यांची दुचाकी पोलीस मुख्यालयातील शिवाजी मैदानातून चोरी गेली होती. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेकडून याचा समांतर तपास सुरू होता. खबऱ्यांच्या नेटवर्कमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहीत रामसखा बलराम पांडे (३२, मेढरा, मिर्झापूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेली दुचाकी त्याने चोरल्याची कबुली दिली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक, सदरमधून दोन व नागपूर ग्रामीणमधील बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन वाहने चोरी केल्याचे सांगितले. त्याने नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केल्याचीदेखील माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सहा दुचाकी, एक टीव्ही असा ३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, गजानन चांभारे, मनोज राऊत, नरेश तुमडाम, संदीप चंगोले, दिनेश डवरे, कमलेश गणेर, प्रवीण शेळके, आशीष धंदरे, सुरेश तेलेवार, सुनिल कुवर, मंगल जाधव, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.