वाहनचोरीच्या प्रकरणात पकडले, आरोपी निघाला सराईत गुन्हेगार
By योगेश पांडे | Published: April 26, 2024 04:45 PM2024-04-26T16:45:04+5:302024-04-26T16:47:57+5:30
Nagpur : मेट्रो स्थानकाच्या पार्किंगमधून चोरी करत होता वाहने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो स्थानकाच्या पार्किंगमधून वाहनचोरीच्या प्रकरणात पकडण्यात आलेला आरोपी सराईत चोरटा निघाला. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.
१२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास प्रतिक येरगुडे (२३) यांची दुचाकी छत्रपती चौक मेट्रो स्थानकाच्या पार्किंगमधून चोरी गेली होती. त्यांच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रकरणाच्या समांतर तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून हर्ष उर्फ ईक्का महेंद्र रामटेके (२३, भांडेप्लॉट, सक्करदरा) याला ताब्यात घेतले. तो मुळचा गोंदियातील तिरोडा येथील आहे. त्याने गुन्हा केल्याची कबुली केली. त्याचा रेकॉर्ड तपासला असता तो वाहनचोरी, घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याची बाब समोर आली. चौकशीतून त्याने तिरोडा येथून एक तर राणाप्रतापनगर व गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन दुचाकी चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी पाचही दुचाकी जप्त केल्या व त्याला प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, रितेश तुमडाम, बबन राऊत, विनोद देशमुख, सुनित गुजर, हेमंत लोमारे, शरद चांभारे, सोनू भावरे, सुशांत सोळंके, मनोज टेकाम, योगेश सातपुते, रविंद्र राऊत, स्वप्निल खोडके व नितीन बोकुलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.