कोरोनाचे नमुने घेण्यासाठी आलेल्या ‘मुन्नाभाई’ला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:38+5:302021-06-11T04:06:38+5:30
नागपूर : मेडिकलमध्ये मेडिसीन विभागाचा निवासी डॉक्टर सांगत, कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी आलेला तोतया डॉक्टर ‘मुन्नाभाई’ला ‘कॅज्युअल्टी मेडिकल ...
नागपूर : मेडिकलमध्ये मेडिसीन विभागाचा निवासी डॉक्टर सांगत, कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी आलेला तोतया डॉक्टर ‘मुन्नाभाई’ला ‘कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर’ने (सीएमओ) पकडल्याने गुरुवारी खळबळ उडाली. हा तोतया डॉक्टर कधी मेडिसीनमध्ये, तर कधी ऑर्थाेपेडिक विभागात निवासी डॉक्टर असल्याचे सांगून दुसऱ्या विभागातील डॉक्टरांना विशिष्ट रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचा सल्ला देत रुग्णांकडून पैसे उकळत होता.
प्राप्त माहितीनुसार, सिद्धार्थ जैन या नावाची प्लेट ॲप्रनवर लावून कॅज्युअल्टीच्या बाहेर उभा राहून गरीब व गरजू रुग्णांना तो हेरत होता. चांगल्या उपचाराची हमी देत त्यांच्याकडून पाच ते दहा हजार रुपये घेत होता. ॲप्रन घातलेला व गळ्यात स्टेथेस्कोप लटकवून असलेल्या या डॉक्टरला पाहून काही रुग्ण विश्वास ठेवून पैसेही देत होते. तो त्या रुग्णासोबत कॅज्युअल्टीमध्ये किंवा वॉर्डात जाऊन तेथील निवासी डॉक्टरांना संबंधित रुग्णाकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना करीत होता. मात्र, नंतर तो गायब होत असल्याने याविषयी मेडिकल प्रशासनाकडे काही रुग्णांच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे सुरक्षा रक्षक व ‘सीएमओ’ सतर्क होते. गुरुवारी सकाळी मेडिकलच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात संशयित कोरोना रुग्णाचे नमुने घेण्यासाठी आलेल्या एका अनोळखी डॉक्टरवर ‘सीएमओ’चे लक्ष गेले. त्याची विचारपूस केल्यावर त्याने निवासी डॉक्टर असल्याचे सांगितले. परंतु त्याच्या हालचालींवर संशय येताच ‘सीएमओ’नी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. लागलीच त्याला सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पकडले. त्यानंतरही स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगून, एम्स दिल्ली येथून एमबीबीएसची पदवी घेतल्याचे त्याने सांगितले. मेडिकल प्रशासनाने अधिक तपासासाठी त्याला अजनी पोलीस ठाण्याच्या हवाली केले आहे. यापूर्वीही मेडिकलमध्ये ॲप्रन घालून वॉर्डात फिरत असलेल्या अशाच तोतया डॉक्टरला पकडले होते.