उपद्रवी माकडास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:09 AM2021-02-15T04:09:37+5:302021-02-15T04:09:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : वनविभागाच्या पथकाने जानेवारी महिन्यात रामटेक शहरातील काळ्या ताेंडाच्या उपद्रवी माकडला पकडून जंगलात साेडल्याने नागरिकांना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : वनविभागाच्या पथकाने जानेवारी महिन्यात रामटेक शहरातील काळ्या ताेंडाच्या उपद्रवी माकडला पकडून जंगलात साेडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला हाेता. त्यातच काही दिवसांपासून लाल ताेंडाच्या माकडाने हैदाेस घालायला सुरुवात केली हाेती. त्या माकडाने आठ दिवसांत ४० नागरिकांसह पाच बकऱ्यांना चावा घेत जखमी केले हाेते. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने शनिवारी (दि. १३) त्या माकडाला पकडून जंगलात साेडले.
या लाल ताेंडाच्या माकडाने आठवडाभरापासून रामटेक शहरात हैदाेस घातला हाेता. त्या चवताळलेल्या माकडाने आठवडाभरात ४० नागरिकांसह पाच बकऱ्यांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली हाेती. त्या माकडाने रामटेक शहरातील लकडजंग परिसरात देवा हिंगे, सुरेश पगाडे, सुखदास मराठे, सेरानंद लिल्हारे, महंत टेंभुर्णे यांच्यासह काही सफाई कामगारांना चावा घेत जखमी केले हाेते. त्या उपद्रवी माकडाचा कायम बंदाेबस्त करण्याची मागणीही नागरिकांनी स्थानिक नगरपरिषद प्रशासनासह वनविभागाकडे केली हाेती.
परिणामी, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या माकडाचा वावर असलेल्या भागात काही पिंजरे लावले हाेते. ते माकड शनिवारी त्या पिंजऱ्यात अडकले. त्यानंतर, त्याला रात्री माेगरकशाच्या जंगलात साेडण्यात आल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली. त्याला पकडून जंगलात साेडण्याची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी. शेंडे व क्षेत्र सहायक देवेंद्र अगडे यांच्या मार्गदर्शनात वनसंरक्षक पंकज कारामोरे, नरेंद्र कुमरे, सौरभ चौधरी, अमोल अंबादे यांनी पार पाडली.