रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:26 AM2020-12-16T04:26:58+5:302020-12-16T04:26:58+5:30
देवलापार : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामटेक तालुक्यातील कट्टा-पेंढरी मार्गावर कारवाई करीत रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. ...
देवलापार : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामटेक तालुक्यातील कट्टा-पेंढरी मार्गावर कारवाई करीत रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. त्यात दाेघांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, त्यांच्याकडून ५ लाख ५ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १४) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देवलापार परिसरात गस्तीवर असताना त्यांना कट्टा परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी कट्टा-पेंढरी मार्गावर नाकाबंदी केली. यात त्यांनी एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अडवून झडती घेतली. त्या ट्रॅक्टरच्या एमएच-४०/एल-६११८ क्रमांकाच्या ट्राॅलीमध्ये रेती असल्याचे निदर्शनास आले. ती रेती विना राॅयल्टी असून, वरघाट (ता. रामटेक) शिवारातील नाल्यातून अवैध उपसा करून आणल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी रेतीसह ट्रॅक्टर ताब्यात घेतला.
या कारवाईमध्ये पाच लाख रुपयांचा ट्रॅक्टर पाच हजार रुपयांची रेती आणि ४०० रुपयांची टिकास असा एकूण ५ लाख ५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर काेडवते (३०, रा. हिवरा पथरई, ता. रामटेक) व मालक गाैरव चंद्रपाल लालमाेरे (३४, रा. पेंढरी देवलापार, ता. रामटेक) यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. याप्रकरणी ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.