चाेरीच्या पाईपसह ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:13 AM2021-09-17T04:13:14+5:302021-09-17T04:13:14+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : खैरी (ता. कामठी) शिवारातील कंपनीच्या आवारातील पाईप चाेरून घेऊन जाणारा ट्रक कामठी (नवीन) पाेलिसांच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : खैरी (ता. कामठी) शिवारातील कंपनीच्या आवारातील पाईप चाेरून घेऊन जाणारा ट्रक कामठी (नवीन) पाेलिसांच्या पथकाने पाठलाग करून पकडला. यात चाेरट्यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ११ पाईप व ट्रक असा एकूण १५ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. १५) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास लिहिगाव (ता. कामठी) शिवारात करण्यात आली.
खैरी शिवारातील समृद्धी इन्फोटेक प्रोजेक्ट नामक कंपनी असून, या कंपनीच्या आवारातून ११ नग माेठे लाेखंडी पाईप चाेरीला गेल्याची तक्रार कंपनीचे व्यवस्थापक जुगनू सुखदेव सत्यसेवक (३७, रा. अजनी) यांनी पाेलिसात दाखल केली हाेती. ही चाेरी सचिन अशोक साहू (२७, रा. वाठोडा, नागपूर) याने केली असून, त्याने पाईप एमएच-४०/बीजी-३९६१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये टाकून नेल्याची माहितीही पाेलिसांना प्राप्त झाली हाेती.
ताे ट्रकसह लिहिगाव शिवारातील राईस मिलजवळ उभा असल्याचे कळताच पाेलिसांनी लिहिगाव शिवार गाठले. पाेलिसांना पाहताच त्याने ट्रक सुरू करून पळ काढला. मात्र, पाेलिसांनी लगेच पाठलाग करून ट्रक अडविला व त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून १० लाख रुपयांचा ट्रक, ५ लाख ५० हजार रुपयांचे ११ नग पाईप आणि ११ हजार रुपयांचा माेबाईल फाेन असा एकूण १५ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार विजय मलचे यांनी दिली.
त्याच्याकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता पाेलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, हेडकॉन्स्टेबल पप्पू यादव, प्रमोद वाघ, अनिल बाळराजे, मनोहर राऊत, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, नीलेश यादव, ललित शेंडे, सुधीर कनोजिया, संदीप गुप्ता, उपेंद्र यादव, सुरेंद्र शेंडे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३७९, ३८० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.