खासगी बांधकामाला पाणीपुरवठा करणारे दोन टँकर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:58 PM2020-05-27T19:58:00+5:302020-05-27T19:59:59+5:30
शहरालगतच्या भागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे मनपाच्या टँकरव्दारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी बहादुरा येथे उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरालगतच्या भागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे मनपाच्या टँकरव्दारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी बहादुरा येथे उघडकीस आला.
बहादुरा भागातील संजुबा शाळेच्या बाजूला खासगी इमरतीचे बांधकाम सुरू आहे. येथे एमएच ४९-८५५ व एमएच ४९-०८५२ क्रमांकाच्या दोन टँकरला पाणीपुरवठा करताना स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी पकडले. दोन्ही टँकरचा पाणीपुरवठा करण्याबाबतचा परवाना तात्काळ रद्द करण्याचे आदेश जलप्रदाय विभागाला दिले. तसेच दोन्ही टँकर मालकांची अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले. महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असताना आणखी काही टँकरव्दारे ग्रामीण भागात खासगी बांधकामासाठी पाणीपुरवठा होतो का, याची चौकशी करण्याचे आदेश जलप्रदाय विभागाला दिले.