फूलकोबीचा तोरा कायम; पालेभाज्याही महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 08:00 PM2022-09-12T20:00:08+5:302022-09-12T20:01:29+5:30
Nagpur News स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक कमी असल्यामुळे किरकोळमध्ये बहुतांश भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलोदरम्यान आहेत.
नागपूर : महालक्ष्मीचा सण झाला असला तरी भाजीपाल्याचा भाव कमी होताना दिसत नाही. स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक कमी असल्यामुळे किरकोळमध्ये बहुतांश भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलोदरम्यान आहेत. त्यामुळे सामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे. पावसामुळे पालेभाज्यांचा दर्जा निकृष्ट आहे.
पालेभाज्याही महाग
पावसामुळे पालेभाज्यांचे पीक शेतातच खराब झाले आहे. आवक कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत. पालक, मेथी, चवळी, आंबाडी, लालभाजीचे भाव आवाक्याबाहेर आहेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून भाव कमी होतील.
पावसामुळे नुकसान
पावसामुळे सर्व भाज्यांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाने मध्यंतरी २० दिवस दडी मारल्याने भाज्यांच्या पिकांना फायदा झाला, पण पुन्हा पावसामुळे नुकसान झाले आहे.
मागणी वाढली, पुरवठा कमी
सप्टेंबर महिन्यात काही नवीन भाज्यांची आवक बाजारात सुरू होते. पण यंदा पावसामुळे उत्पादनावर परिणाम होऊन पुरवठा कमी झाला. गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणामध्ये भाज्यांची मागणी वाढली आणि तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे दरवाढ झाली. पुढील महिन्यात नवीन उत्पादनानंतरच भाव कमी होतील.
राम महाजन, विक्रेते.
गेल्या दोन महिन्यांपासून भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. पावसामुळे दर्जा खराब आहे. चांगल्या भाज्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
साधना मोहाले, गृहिणी.
नैसर्गिक आपत्तीने भाज्यांचे भाव वाढल्यामुळे महिन्याचे बजेट वाढले आहे. पुढे एक महिना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील. दर कमी व्हावेत.
प्राजक्ता किरपाने, गृहिणी.