लवकर कळेल वाघ, बिबट्यांच्या मृत्यूचे कारण; नागपुरात वन्यजीव डीएनए प्रयाेगशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 10:07 PM2021-10-22T22:07:55+5:302021-10-22T22:08:40+5:30
Nagpur News वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग नागपुरात सुरू झाल्याने वन्यजीव गुन्हेगारीच्या तपासाला गती मिळणार आहे.
नागपूर : वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग नागपुरात सुरू झाल्याने वन्यजीव गुन्हेगारीच्या तपासाला गती मिळणार आहे. यापूर्वी एखाद्या वन्यप्राण्याच्या मृत्यूचे कारण शाेधण्यासाठी हैदराबाद किंवा देहराडूनला नमुने पाठवावे लागत हाेते. तपास रिपाेर्ट मिळण्यास बराच कालावधी जात हाेता. मात्र नागपुरात प्रयाेगशाळा झाल्याने ही प्रतीक्षा संपणार असून वाघ, बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यूचे कारण शाेधण्यास वेळ लागणार नाही.
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पापैकी पाच प्रकल्पांस अनेक अभयारण्य विदर्भात आहेत. त्यामुळे विदर्भात वाघ, बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. त्यामुळेच शिकाऱ्यांची नजरही या भागाकडे अधिक असते. २०१२ ते २०१५ च्या दरम्यान वाघ आणि बिबट्याच्या शिकारीची अनेक प्रकरणे समाेर आली हाेती. ६ वर्षांनंतर पुन्हा वन्यजीव शिकार व अवयवांच्या तस्करांचे अटकसत्र चालले असून, मागील तीन महिन्यांत वनविभागाने १० च्यावर कारवाया करून ३५ आराेपींना पिंजऱ्यात टाकले आहे. मात्र अटकेनंतरही सबळ पुराव्याअभावी आराेपींना जामीन मिळताे व ते सुटून जातात. अशा प्रकरणात वन्यप्राण्यांच्या डीएनए तपासाचे रिपाेर्ट महत्त्वाचे असतात. त्यामुळे अनेक वर्षांपासून विदर्भासह संपूर्ण राज्यातील वन्यप्राण्यांच्या संशयास्पद मृत्यूचे नमुने देहराडून व हैदराबाद येथील प्रयाेगशाळेत पाठविले जात हाेते. या प्रयाेगशाळा केंद्र शासनाच्या अधिन असल्याने अधिक तपासणी शुल्क भरावे लागत हाेते. यानंतरही रिपाेर्ट मिळण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागत हाेती. या काळात संबंधित नमुने खराब हाेण्याची आणि तपास रिपाेर्टबराेबर येण्याची शक्यताही कमीच राहत हाेती. याचा परिणाम थेट तपासावर पडत हाेता. मात्र आता राज्यातील पहिली प्रयाेगशाळा सुरू झाल्याने बाहेरच्या प्रयाेगशाळांवरील अवलंबित्व संपेल आणि लवकर रिपाेर्ट मिळेल.
न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळणार
राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्या मते अनेक वर्षांपासून वाघ शिकारीच्या प्रकरणात नमुने हैदराबाद व देहराडूनला पाठविले जात हाेते. मात्र रिपाेर्टसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत हाेती. यामुळे न्यायालयाच्या प्रक्रियेलाही उशीर हाेत हाेता, ज्याचा फायदा आराेपींना मिळत हाेता. आता नागपुरात वन्यजीव डीएनए परीक्षण प्रयाेगशाळा झाल्याने न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.