गर्भाशय पेशींचा ट्यूमर वंध्यत्वास कारणीभूत

By admin | Published: July 24, 2016 02:17 AM2016-07-24T02:17:16+5:302016-07-24T02:17:16+5:30

गर्भाच्या पेशींमध्ये झालेला ट्यूमर (फायब्रॉईड) वंध्यत्वास कारणीभूत ठरतो. याचे प्रमाण २० टक्क्यांवर आहे.

Causes of uterine muscle tumor inflamation | गर्भाशय पेशींचा ट्यूमर वंध्यत्वास कारणीभूत

गर्भाशय पेशींचा ट्यूमर वंध्यत्वास कारणीभूत

Next

रिष्मा पै : ‘एमएसआर-२०१६’ वंध्यत्व निवारण नोडल परिषद
नागपूर : गर्भाच्या पेशींमध्ये झालेला ट्यूमर (फायब्रॉईड) वंध्यत्वास कारणीभूत ठरतो. याचे प्रमाण २० टक्क्यांवर आहे. गेल्या काही वर्षांत याचे प्रमाण वाढत आहे. पुरुषांमध्येही वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असून, हे प्रमाण ५० टक्क्यांवर गेले आहे, अशी माहिती महाराष्ट्र चॅप्टर आॅफ इंडियन सोसायटी आॅफ असिस्टेड रिप्रोडक्शनच्या (एमएसआर) अध्यक्ष डॉ. रिष्मा पै यांनी येथे दिली.
महाराष्ट्र चॅप्टर आॅफ इंडियन सोसायटी आॅफ असिस्टेड रिप्रोडक्शन आणि नागपूर आॅब्स्टेस्ट्रीक्स अ‍ॅण्ड गायनाकॉलॉजिकल सोसायटीच्या (एनओजीएस) संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘एमएसआर-२०१६’ वंध्यत्व निवारण नोडल परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली. परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर एमएसआरच्या उपाध्यक्ष डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. मंगला केतकर, परिषदेचे आयोजक सचिव डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. साधना पटवर्धन व एनओजीएसच्या डॉ. अनुराधा रिधोरकर उपस्थित होत्या.
डॉ. पै म्हणाल्या, पुरुष आणि महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण हे ५०-५० टक्के होते. परंतु गेल्या काही वर्षांत पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण ५० टक्क्यांवरून वर गेले आहे. ही धोक्याची घंटा आहे. डॉ. चैतन्य शेंबकर म्हणाले, भारतात वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
परंतु अनेकांचा संशोधन करण्याकडे कल नाही. यावेळी त्यांनी शरीरातील हार्माेन्सच्या विविध बदलांबाबत माहिती दिली. (प्रतिनिधी)

टेस्ट ट्यूब बेबी प्रगत विज्ञानाची देणगी -अमृता फडणवीस
उद्घाटनीय भाषणात अमृता फडणवीस म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीला मातृत्व साद घालत असते. परंतु वंध्यत्वामुळे काहींना हा आनंद उपभोगता येत नाही. प्रगत तंत्रज्ञान, औषधे आणि उपचार अशा टेस्ट ट्यूब बेबीमुळे वंध्यत्वावर मात करणे शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञान मातृत्वासाठी वरदान ठरले असून त्याचे श्रेय डॉक्टरांना जाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मातृत्वाचे सुख निपुत्रिकांना मिळवून देण्याचे पुण्य डॉक्टरांना जाते, असे सांगत डॉक्टरांनी बेटी बचाओ...बेटी पढाओ या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अभियानाला बळ देण्याचे आवाहनही केले.
वंध्यत्व निवारणाची टक्केवारी वाढली -डॉ. पालशेतकर
डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या, आतापर्यंत ‘इंट्रासायटोप्लाजमिक स्पर्म इंजेक्शन’ हे तंत्रज्ञान पुरुष शुक्राणूंची निवड करताना वापरले जात असे. त्याद्वारे शुक्राणू २०० पट मोठे दिसतात. नवीन दुर्बिणीत ‘इंट्रासायटोप्लाजमिक मॉर्फोलॉजिकली सिलेक्टेड स्पर्म’ इंजेक्शन तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यात शुक्राणूंचा आकार ७२०० पट अधिक मोठा दिसतो. त्यामुळे अत्यंत चांगल्या दर्जाचे शुक्राणू स्त्री-बीजासह संयोग करण्यासाठी निवडले जातात. यामुळे वंध्यत्व निवारणाची टक्केवारी वाढली आहे. महाराष्ट्रात पन्नास हजारावर टेस्टट्यूब बेबी सामान्यपणे जीवन जगत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

 

Web Title: Causes of uterine muscle tumor inflamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.