सावधगिरी हाच उत्तम उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:09 AM2021-04-30T04:09:26+5:302021-04-30T04:09:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबांवर भावनिक आघात झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबांवर भावनिक आघात झाला आहे. ही परिस्थिती पुन्हा ओढावू नये यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर सावधगिरी हाच उत्तम उपाय आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वच जण तुटले आहेत. त्यामुळे दवाखान्यात जाऊन उपचार करणे हा सर्वात कठीण पर्याय आहे. त्यामुळे नियम पाळा, कोरोनाला टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित कोविड संवाद या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात बुधवारी श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. विक्रम राठी आणि अतिदक्षता विशेषज्ञ डॉ. राजन बारोकर सहभागी झाले होते.
कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वाईट आहे. अनेक जण लक्षणं असतानाही दुर्लक्ष करीत आहेत. त्रास वाढल्यानंतर डॉक्टरकडे जातात. त्यातून ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होते आणि तोपर्यंत बराच वेळ झालेला असतो. लक्षणे नसल्यामुळे अनेक रुग्ण उशिरा रुग्णालयात येतात. यामुळे मृत्यू वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.