काेराडीतील काेविड सेंटरला रुग्णच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:31+5:302021-05-09T04:09:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कोराडी : मोठा गाजावाजा करून कोराडी येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आठ दिवस उलटूनही ...

The Cavid Center in Karadi did not receive any patients | काेराडीतील काेविड सेंटरला रुग्णच मिळेना

काेराडीतील काेविड सेंटरला रुग्णच मिळेना

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोराडी : मोठा गाजावाजा करून कोराडी येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आठ दिवस उलटूनही एकही रुग्ण दाखल झाला नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना व ऑक्सिजन समस्या असताना कोराडीतील २० बेडच्या कोविड सेंटरमध्ये १० ऑक्सिजन बेड असूनही याचा लाभ घेण्यासाठी एकही रुग्ण आढळू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त हाेत आहे. दुसरीकडे अनेक रुग्णांना या ठिकाणी प्रवेश दिला जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. हे कोविड केअर सेंटर केवळ शोभेची वास्तू तर बनणार नाही ना, असाही प्रश्न आता चर्चिला जात आहे.

महानिर्मितीने सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत कोट्यवधींच्या निधीतून उभारलेल्या या रुग्णालयात काेविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी विविध स्तरातून केली गेली. सध्या हे रुग्णालय दत्ता मेघे मेडिकल कॉलेज व शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, वानाडोंगरी यांच्या अखत्यारित आहे. या ठिकाणी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सुरू करून आरोग्य सुविधा देण्याचे कार्य सुरू केले. कोरोनाची स्थिती लक्षात घेता प्रशासनाने हे हॉस्पिटल ताब्यात घेऊन मागणीनुसार येथे कोविड केअर सेंटर सुरू केले. त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांनी स्पर्धा चालवली होती. अखेर ३० एप्रिलपासून या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू झाले. शासनाच्या वतीने पाच तज्ज्ञ डॉक्टर व पाच नर्सेस असा १० कर्मचाऱ्यांचा स्टाफ येथे पुरवण्यात आला आहे. येथे एकूण २० बेड असून, त्यापैकी १० बेड ऑक्सिजनयुक्त आहेत.

३० एप्रिलपासूनच अनेक रुग्णांनी येथे हजेरी लावली. परंतु या ठिकाणी असलेल्या निकषाचा आधार घेत येथील डाॅक्टरांनी रुग्णांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली. एकीकडे जिल्ह्यात रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसताना, कोराडी-महादुला व गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना रुग्णांची संख्या मोठी असताना या केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल न होणे हे कशाचे दिशानिर्देश आहे, अशी चर्चा तज्ज्ञ मंडळीत होत आहे. कोविड केअर सेंटर सुरू झाल्यावर अनेकांना या ठिकाणी उपचार मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र या सेंटरमध्ये विनालक्षण व ज्या रुग्णांना सौम्य कोविड आहे, अशा रुग्णांवरच विलगीकरण व उपचार केले जातात. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांचे ऑक्सिजन ९० पेक्षा कमी व एचआरसीटीचा स्कोर ८ पेक्षा जास्त असल्यास अशा रुग्णांना या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. कोविड केअर सेंटरच्या नियमानुसार ज्या रुग्णांचा एचआरसीटी स्कोर ८ पेक्षा कमी आहे व ऑक्सिजन लेव्हल ९० पर्यंत आहे, अशाच रुग्णांना या ठिकाणी दाखल करण्यात येते. या निकषामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना आल्यापावली परत जावे लागत आहे. रुग्णांची स्थिती गंभीर असल्यास बेडसाठी फिरावे लागत असताना या ठिकाणी मात्र प्रवेश दिला जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

...

चाचण्या आणि रुग्णसंख्याही घटली

कोराडी, महादुला येथे दाेन चाचणी केंद्र आहेत. महादुला नगर पंचायत व सोनेकर कॉलेज ऑफ फार्मसी या दोन ठिकाणी कोविड चाचणी केंद्र आहेत. मागील आठवड्यात या ठिकाणी चाचण्यांची संख्या घटली आहे, साेबतच रुग्णसंख्येतही घट आली आहे. या दोन्ही केंद्रांवर दररोज २०० वर अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. मागील आठवड्यातील आकडेवारीनुसार ४ मे रोजी ५३, ५ मे रोजी ७७, ६ मे ५५, ७ मे ६३ व ८ मे रोजी ६६ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. या कालावधीत केवळ ३३ रुग्णांनी अँटिजन टेस्ट करून घेतल्या. ४ ते ७ मे दरम्यान या परिसरात केवळ २४१ तपासणीतून ५७ रुग्ण पाॅझिटिव्ह आले. टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्ण निघण्याचे प्रमाण मोठे आहे. परंतु चाचण्या कमी होत असल्याने रुग्णसंख्याही घटली आहे.

Web Title: The Cavid Center in Karadi did not receive any patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.