सीबीआयची रेल्वे विभागात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:30+5:302021-07-14T04:10:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी दुपारी रेल्वेच्या एका लाचखोर अधिकाऱ्याच्या मुसक्या बांधून एकच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी दुपारी रेल्वेच्या एका लाचखोर अधिकाऱ्याच्या मुसक्या बांधून एकच खळबळ उडवून दिली. अखिलेश चाैबे असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून, तो रेल्वेत वरिष्ठ मंडळ मेकॅनिकल इंजिनिअर आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एका कंत्राटदाराला एक लाख, ७० हजारांचे बिल घेणे होते. अखिलेश चाैबेने ते हेतूपुरस्सर अडवून ठेवले होते. वारंवार मागणी करूनही प्रलंबित बिल निकाली काढायला चाैबे तयार नव्हता. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने दोन आठवड्यांपूर्वी चाैबेची भेट घेतली. यावेळी चाैबेने बिल काढण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली. घासाघीस केल्यानंतर तो दहा हजारांवर थांबला. दहा हजार लाच दिल्याशिवाय बिल काढून देणार नाही, असे त्याने कंत्राटदाराला सांगितले. त्यामुळे कंत्राटदाराने गुरुवारी सीबीआयकडे धाव घेतली. सीबीआय युनिटच्या अधीक्षक निर्मला देवी यांनी तक्रारीची शहानिशा करून घेतल्यानंतर सोमवारी दुपारी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, सोमवारी दुपारी २.३०च्या सुमारास कंत्राटदाराच्या मागोमाग सीबीआयचे पथक रेल्वेस्थानकाजवळच्या मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात धडकले. चाैबेने कंत्राटदाराकडून लाचेचे दहा हजार रुपये स्वीकारताच चाैबेच्या मुसक्या आवळल्या. एक ते दीड तास त्याच्या कार्यालयाची चाैकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सीबीआयचे पथक निघून गेले.
---
मध्य प्रदेशकडे पथक रवाना
आरोपी चौबेला जेरबंद केल्यानंतर सीबीआयच्या एका पथकाने त्याच्या कार्यालयात, तर दुसऱ्या पथकाने भोले पेट्रोलपंप चाैकाजवळच्या निवासस्थानी झडती सुरू केली. चाैबे मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. त्यामुळे तिसरे एक पथक चाैकशीसाठी मध्य प्रदेशातील चौबेच्या निवासस्थानी पाठविण्यात आले. या तीनही ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली. त्यात काय मिळाले, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही.
---
भ्रष्टाचाऱ्यांच्या तक्रारी द्या ।
समाजाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. नागरिकांकडून तक्रारी मिळत नसल्याने भ्रष्टाचारी बोकाळतात. त्यामुळे अशांना वठणीवर आणण्यासाठी नागरिकांनी सीबीआयकडे तक्रार द्याव्यात, असे आवाहन सीबीआय अधीक्षक निर्मलादेवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.
----