‘पेसो’च्या अधिकाऱ्यांवर ‘सीबीआय’चा ‘हंटर’, १० लाखांची लाच घेताना चौघांना अटक
By योगेश पांडे | Published: January 4, 2024 06:16 PM2024-01-04T18:16:07+5:302024-01-04T18:20:57+5:30
याची पाळेमुळे खोलवर असल्याची शंका घेण्यात येत आहे
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राजस्थानच्या एका केमिकल कंपनीला अतिरिक्त डेटोनेटर्स बनविण्याची परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच घेणाऱ्या ‘पेसो’च्या (पेट्रोलिअम ॲंड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) दोन अधिकाऱ्यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधिक पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह लाच देणारा राजस्थानच्या कंपनीचा संचालक व एक बाहेरील व्यक्तीदेखील जाळ्यात अडकला आहे. या कारवाईमुळे ‘पेसो’त खळबळ उडाली असून याची पाळेमुळे खोलवर असल्याची शंका घेण्यात येत आहे.
‘पेसो’चे देशातील मुख्यालय नागपुरात आहे. येथे मुख्य नियंत्रकासह उपमुख्य नियंत्रक दर्जाचे अधिकारी असतात. या कार्यालयातून देशभरातील स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपन्यांना परवाने दिले जातात आणि कंपन्यांतील उत्पादनावरही लक्षदेखील ठेवले जाते. राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील सूपर शिवशक्ती केमिकल्स प्रा.लि. या कंपनीचे संचालक देविसिंग कच्छवाह याच्या कामासाठी झेरॉक्स दुकानाचा मालक प्रियदर्शन दिनकर देशपांडे (रा. लेक व्ह्यूव अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) याने पैसे घेतल्याची माहिती सीबीआयला मिळाली. संबंधित कंपनीला मार्च २०२४ पर्यंत त्यांच्या डेटोनेटर्स उत्पादनाची क्षमता ७५ टक्क्यांपर्यंत वापरायची होती. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगीसाठी ‘पेसो’च्या दोन अधिकाऱ्यांनी १० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. हा व्यवहार देशपांडेच्या माध्यमातून होणार होता. संबंधित कंपनीच्या परवान्यांमध्ये बदलाचे कामदेखील देशपांडेच्या माध्यमातून पैसे घेऊनच झाले होते. १ जानेवारी रोजी कच्छवाह किसनगड विमानतळावरून नागपुरात पोहोचल्यावर देशपांडेशी भेट झाली. त्यानंतर दोघांनीही ‘पेसो’च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. देशपांडेच्या दुकानातच पैसे देण्याचे निश्चित झाले. सीबीआयला याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सापळा रचण्यात आला व पैसे घेताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. सीबीआयने चौघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
- सव्वादोन कोटींची रक्कम जप्त
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या पथकाने देशपांडे तसेच ‘पेसो’च्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. त्यात देशपांडेच्या घरातून सव्वा कोटी तर एका अधिकाऱ्याच्या घरातून ९० लाख रुपये जप्त करण्यात आले. याशिवाय लाचेची १० लाखांची रक्कमदेखील जप्त करण्यात आली आहे. सीबीआयचे उपमहानिरीक्षक एम.एस. खान यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
- देशपांडे लाचेच्या रॅकेटचा ‘पॉईंट पर्सन’
गेल्या काही वर्षांपासून पेसो कार्यालयातील दोन अधिकारी स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपन्याना कारवाईची भीती दाखवून तसेच स्फोटक निर्मितीचे परवाने रद्द करण्याचा धाक दाखवून लाखो रुपयांची लाच घेत होते. याबाबत नागपूर सीबीआय कार्यालयाला माहिती मिळाल्यानंतर चौकशी करण्यात आली. चौकशीअंती यात प्रियदर्शन दिनकर देशपांडे (रा. लेक व्ह्यूव अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) याचा मोठा हात असल्याची बाब समोर आली. त्याचे सेमीनरी हिल्समधील ‘पेसो’ कार्यालयाजवळ झेरॉक्स सेंटर आहे. तो देशभरातील स्फोटके निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क करून अधिकाऱ्यांसाठी लाचेच्या स्वरुपात पैसे गोळा करतो असे तपासातून समोर आले.