वेकोलिच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 03:22 PM2023-02-04T15:22:02+5:302023-02-04T15:24:08+5:30
सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई
नागपूर : वेकोलिच्या यवतमाळमधील वणी येथील घोन्सा खाणीच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना सीबीआयकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. एका फर्मला डिलिव्हरी ऑर्डर देण्याच्या बदल्यात ३.२३ लाखांची लाचेची मागणी करत एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता घेताना ही कारवाई करण्यात आली. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.
गौतम बसुतकर असे संबंधित व्यवस्थापकाचे नाव आहे. संबंधित फर्मला खाणीतून ८ हजार २०० टन मेट्रिक कोळसा उचलण्याची परवानगी होती. मात्र फर्मला ४ हजार ६२३ मेट्रिक टन कोळसाच उचलता आला. उर्वरित कोळसा उचलण्यासाठी डिलिव्हरी ऑर्डर देण्याची संबंधित फर्मने विनंती केली. मात्र बसुतकरने परवानगी नाकारली व लाचेची मागणी केली. अगोदर केलेली मदत व २ हजार ५०० मेट्रिक टन कोळसा उचलण्याच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या बदल्यात व्यवस्थापकाने रकमेची मागणी केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित फर्मच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने तक्रारीची शहानिशा केली व सापळा रचला. एक लाखाच्या पहिल्या हप्त्याचे पैसे घेताना बसुतकरला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याशिवाय त्याचे कार्यालय व निवासस्थानाचीदेखील झडती घेण्यात आली.