अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:47 AM2020-06-19T00:47:17+5:302020-06-19T00:49:23+5:30
अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांनी ज्या पद्धतीने करायला हवा आहे, तो होताना दिसून येत नाही. आम्ही या तपासाबाबत असमाधानी आहोत. या प्रकरणात राज्यातील दोन मंत्री हस्तक्षेप करीत आहेत. दबाव टाकत आहेत, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांनी ज्या पद्धतीने करायला हवा आहे, तो होताना दिसून येत नाही. आम्ही या तपासाबाबत असमाधानी आहोत. या प्रकरणात राज्यातील दोन मंत्री हस्तक्षेप करीत आहेत. दबाव टाकत आहेत, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.
जलालखेडा, नरखेड येथील उच्चशिक्षित अरविंद बन्सोड यांची गेल्या २७ मे रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप असून, त्यांनी याविरुद्ध आवाज उचलला आहे. याप्रकरणी आज आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होते. यावेळी अरविंदचे वडील व इतर कुटुंबीय हजर होते. आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज गुरुवारी अरविंदच्या कुटुंबीयांची व वकिलांची न्यायालय परिसरात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर रविभवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते. अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अॅट्रॉसिटी दाखल झाल्यावर ज्या पद्धतीने चौकशी व्हायला हवी, तशी होताना दिसून येत नाही. त्यामुळे आम्ही या चौकशीवर समाधानी नाही. अरविंदच्या कुटुंबीयांना न्याय द्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे.