माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:07 AM2021-04-25T04:07:30+5:302021-04-25T04:07:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी छापा घातला. शनिवारी ...

CBI raids former Home Minister Anil Deshmukh's residence | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी छापा घातला. शनिवारी सकाळी ७.३० ते ७.४५ च्या सुमारास इनोव्हा आणि आर्टिका अशा दोन गाड्यांमधून सीबीआयचे पथक देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवास्थानी दाखल झाले. पीपीई किट घालून असलेल्या या पथकातील अधिकाऱ्यांनी देशमुखांना आपली ओळख सांगून चौकशीसाठी आल्याची माहिती दिली. यावेळी देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांसह सहा ते आठ जण नाश्ता करण्याच्या तयारीत होते. त्या सर्वांचे मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आले. प्रारंभी या पथकाने देशमुख यांच्या निवासस्थानाचा कानाकोपरा तपासला. कपाट, लॉकर आदींची तपासणी केल्यानंतर काही कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याची पाहणी केल्यानंतर या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनी माजी गृहमंत्री देशमुख यांची प्रदीर्घ विचारपूस वजा चौकशी केली.

विशेष म्हणजे, निवासस्थानी पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांना सीबीआयकडून साधी सूचनाही देण्यात आली नाही. त्यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत देशमुख यांचे निवास स्थान ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते ते सीताबर्डी पोलीससुद्धा या कारवाईपासून अनभिज्ञ होते. दरम्यान, देशमुख यांच्या निवासस्थानात पीपीई किट घालून गेलेले सीबीआयचे पथक असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर सीताबर्डीचा पोलीस ताफा देशमुख यांच्या निवासस्थानासमोर पोहोचला.

---

नेमके काय कळेचना!

सीबीआयच्या पथकात नेमके किती आणि कुठले अधिकारी आहेत, ते ८ तासांनंतरही स्पष्ट झाले नव्हते. आयजी आणि एडीजी दर्जाचे तीन वरिष्ठ अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह देशमुख यांच्या निवासस्थानी चौकशी करीत असल्याचे सांगितले जात होते.

----

उलट-सुलट चर्चा

देशमुख यांच्या निवासस्थानाच्या आतमध्ये नेमकं काय सुरू आहे, हे निवासस्थानाच्या समोर असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहीत नव्हते. मात्र दिल्ली, मुंबईचा हवाला देऊन काही वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळे वृत्त दिल्यामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते.

-----

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी

या कारवाईने शहरात एकच खळबळ उडवून दिली. दुपारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जितेंद्र तिवारी आणि महिला नेत्या नूतन रेवतकर आपल्या कार्यकर्त्यांसह देशमुख यांच्या निवासस्थानासमोर आल्या. त्यांनी येथे सीबीआयच्या कारवाईचा जोरदार निषेध नोंदविला. केंद्र सरकार आणि अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी आणि राज्यात सत्तेवर येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील लोकांच्या मदतीने कट कारस्थान करून सीबीआयची कारवाई करून घेतल्याचा आरोप या नेत्यांनी केला. सुमारे २० मिनिटे त्यांनी येथे घोषणाबाजी केल्यानंतर सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस, द्वितीय निरीक्षक काचोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

----

नो रिस्पॉन्स

किट घातलेला एक अधिकारी बाहेर आला. त्याने त्यांच्या एका कारमधून कागदपत्रांचा गठ्ठा तर दुसऱ्या कारमधून अन्य साहित्य बाहेर काढले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. मात्र, त्यांना कसलाही प्रतिसाद न देता हा अधिकारी पाच मिनिटांत बाहेरून आतमध्ये निघून गेला.

---

Web Title: CBI raids former Home Minister Anil Deshmukh's residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.