नीरीतील भ्रष्टाचारावर सीबीआयचा हंटर, माजी संचालकाच्या गैरकारभाराची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 07:08 AM2024-07-11T07:08:25+5:302024-07-11T07:08:42+5:30
गुन्हेगारी षड्यंत्र, भ्रष्टाचाराचे तीन गुन्हे : देशभरात १७ जागी छापे
नागपूर : सीबीआयच्या पथकाने बुधवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'नीरी'च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) परिसरात बुधवारी सकाळी धाड टाकल्याने खळबळ उडाली. नीरीचे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी पथक करत आहेत. त्याच्याशी निगडित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीबीआयने कुमार यांच्यासोबत पाच वैज्ञानिक तसेच पाच खासगी फर्म्सविरोधात गुन्हेगारी षड्यंत्र व भ्रष्टाचाराचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
राकेश कुमार यांच्या कार्यकाळात केवळ आराखडा बनविण्यात आलेल्या संशोधनांवर पैसे दिल्याचा आरोप होता. पैसे घेतल्यावर केवळ कागदपत्रे तयार करण्यात आली होती. विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला, त्यातील खर्चावरही आक्षेप घेण्यात आले होते.
चार राज्यांत छापेमारी :
सीबीआयने महाराष्ट्रासह हरयाणा, बिहार, दिल्ली येथेही छापे टाकण्यात आले. सीबीआयच्या पथकाने बेकायदेशीर दस्तावेज, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, ज्वेलरी जप्त केली आहे.
हे आहेत आरोपी :
डॉ. राकेश कुमार, माजी संचालक, नीरी। डॉ. आत्या कपले, तत्कालीन मुख्य वैज्ञानिक। डॉ. रितेश विजय, तत्कालीन प्रधान वैज्ञानिक। डॉ. सुनील गुलिया, तत्कालीन फेलो, दिल्ली झोनल सेंटर। डॉ. संजीवकुमार गोयल, तत्कालीन वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक । अलकनंदा टेक्नॉलॉजी प्रा.लि., ऐरोली, नवी मुंबई। मे. एन्चिरो पॉलिसी रिसर्च इंडिया प्रा.लि., ठाणे। मे. एमेर्जी एन्व्हिरो प्रा.लि., आयआयटी बॉम्बे, पवई। मे. वेस्ट टू एनर्जी रिसर्च अॅन्ड टेक्नॉलॉजी कौन्सिल-इंडिया, प्रभादेवी, मुंबई। मे. ईएसएस एन्व्हायर्नमेंट कन्सल्टंट प्रा.लि.