सीबीआयच्या आकस्मिक धाडी आणि तपासण्या
By admin | Published: December 30, 2014 12:51 AM2014-12-30T00:51:51+5:302014-12-30T00:51:51+5:30
महालेखाकार (एजी) कार्यालय परिसरातील बांधकामाचे प्रकरण प्रदीर्घ गाजले. विविध शासकीय कार्यालयाच्या कारभाराची जो विभाग अंकेक्षण (आॅडिट) करतो. त्याच विभागाच्या इमारत बांधकामाच्या
नागपूर : महालेखाकार (एजी) कार्यालय परिसरातील बांधकामाचे प्रकरण प्रदीर्घ गाजले. विविध शासकीय कार्यालयाच्या कारभाराची जो विभाग अंकेक्षण (आॅडिट) करतो. त्याच विभागाच्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी सीपीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांच्या हितासाठी गैरप्रकार अवलंबल्याचा आरोप होता. येथील निकृष्ट बांधकामाची संयुक्तपणे तपासणी करून सीबीआयने नमूने गोळा (जप्त) केले. संबंधित कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. १५ वर्षांपासून समाधानकारक प्रदर्शन नसूनही सुरू असलेल्या चांडक अॅन्ड सन्स या पेट्रोल पंपावर एचपीच्या अधिकाऱ्यांसह सीबीआयने संयुक्तपणे तपासणी आणि परीक्षण केले.
ओरिएन्टल इंशोरन्स कंपनी लिमिटेडच्या काही अधिकाऱ्यांवर ‘क्लेम सेटलमेंट‘मध्ये संशयास्पद भूमिका वठविल्याचा आरोप होता. शिवाय हिंदी आणि इंग्रजी टंकलेखकांच्या निवड प्रक्रियेतही गैरप्रकार झाल्याची तक्रार मिळाल्यामुळे सीबीआयने ओरिएन्टलच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त आकस्मिक तपासणी करून महत्त्वपूर्ण दस्तावेज ताब्यात घेतले होते. त्याचप्रमाणे शंकास्पद खरेदी प्रक्रिया आणि नोंदी करून वादग्रस्त ठरलेल्या भारत संचार लिमिटेडच्या काही अधिकाऱ्यांकडे खात्यातीलच वरिष्ठांसोबत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी करून या प्रकरणाची चौकशी केली. (प्रतिनिधी)
सैन्यदलाला हादरवणारी परीक्षा
आॅल इंडिया आर्मी रिक्रूटमेंट एन्ट्रन्स टेस्ट नागपूर केंद्रावर सुरू होती. परीक्षेचा पेपर फुटल्याची तसेच पैसे घेऊन काही विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितली जात असल्याची तक्रार अधीक्षक संदीप तामगाडगे यांना अगदी काही तासांपूर्वी कळली. त्यांनी लगेच वेगवेगळ्या चमू परीक्षा केंद्रांवर पाठवल्या. अनेक संशयितांची चौकशी करून सैन्य दलाच्या परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या टँगो चार्ली सेना, सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक जयकुमार बेलखोडे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडवून दिली होती. सैन्य दलाच्या शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी नागपुरात येऊन या संपूर्ण गैरप्रकाराची माहिती सीबीआयकडून घेतली होती. -