‘सीबीएसई’ दहावी निकाल जाहीर : मुलींची ‘टॉपर्स’मध्ये बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 10:23 PM2020-07-15T22:23:01+5:302020-07-15T22:29:35+5:30

‘कोरोना’मुळे लांबलेला ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी दुपारी घोषित करण्यात आला अन् विद्यार्थी व पालकांचा जीव भांड्यात पडला. यंदाच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांनी ‘टॉप’ केले असले तरी, ९० टक्क्यांहून अधिक गुण असणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींचेच जास्त प्रमाण आहे.

CBSE 10th results announced: Girls win in 'Toppers' | ‘सीबीएसई’ दहावी निकाल जाहीर : मुलींची ‘टॉपर्स’मध्ये बाजी

‘सीबीएसई’ दहावी निकाल जाहीर : मुलींची ‘टॉपर्स’मध्ये बाजी

googlenewsNext
ठळक मुद्देअठराशेहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे लांबलेला ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी दुपारी घोषित करण्यात आला अन् विद्यार्थी व पालकांचा जीव भांड्यात पडला. यंदाच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांनी ‘टॉप’ केले असले तरी, ९० टक्क्यांहून अधिक गुण असणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींचेच जास्त प्रमाण आहे. उपराजधानीत ‘सीबीएसई’च्या सुमारे ५० शाळा असून, यातील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील अठराशेहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. मागील वर्षीप्रमाणे गुणवंतांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे.


उपराजधानीतील बी.पी.भवन्स विद्यामंदिर, त्रिमूर्तीनगर येथील विद्यार्थी ओजस खमेले याने ९९.४ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर मॉडर्न स्कूल (कोराडी मार्ग) येथील विद्यार्थिनी आद्या पांडे हिने ९९.२ टक्के गुण मिळवीत दुसरा क्रमांक मिळविला. बी.पी.भवन्स विद्यामंदिर, त्रिमूर्तीनगर येथील विनिल मोखाडे हा ९९ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आला.


नागपुरातील ‘टॉपर्स’
१ ओजस खमेले बी.पी.भवन्स विद्यामंदिर, त्रिमूर्तीनगर ९९.४
२ आद्या पांडे मॉडर्न स्कूल, (कोराडी मार्ग) ९९.२
३ विनिल मोखाडे बी.पी.भवन्स विद्यामंदिर, त्रिमूर्तीनगर ९९.०
४ अनुष्का सुब्रमण्यम् सेंटर पॉर्इंट स्कूल (काटोल मार्ग) ९८.८
४ नंदिनी कुलकर्णी नारायणा विद्यालयम् ९८.८
४ क्रिषी अग्रवाल बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स ९८.८
४ कृती पाटील बी.पी.भवन्स विद्यामंदिर, त्रिमूर्तीनगर ९८.८
४ अभिरुची पाटील-भगत बी.पी.भवन्स विद्यामंदिर, त्रिमूर्तीनगर ९८.८
५ कलश भट्टड सेंटर पॉईंट स्कूल (वर्धमाननगर) ९८.६
५ खुशी सोनकुसरे मोन्टफोर्ट स्कूल ९८.६
५ अंकित कोल्हे भारतीय कृष्ण विद्या विहार ९८.६
५ वसुधा मीना भारतीय कृष्ण विद्या विहार ९८.६
५ शर्वरी पोकले भारतीय कृष्ण विद्या विहार ९८.६
५ मोलिका अग्रवाल बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स ९८.६
५ पलक अग्रवाल बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स ९८.६
५ आदित्य चांडक बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स ९८.६
५ खुशी केला बी.पी.भवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स ९८.६
५ आदिती नासरे बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर ९८.६
५ मृण्मयी येरपुडे बी.पी.भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर ९८.६

शाळांनादेखील मिळाला दिलासा
मार्च महिन्यात परीक्षा आटोपल्यानंतरदेखील निकाल जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता होती. ‘सोशल मीडिया’वरील अफवांमुळे संभ्रमात भर पडत होती व दररोज शाळांकडे विचारणा होत होती. बुधवारी निकाल लागल्यानंतर शाळांनादेखील दिलासा मिळाला. शहरातील जवळपास सर्वच शाळांची कामगिरी चांगली राहिली. अनेक शाळांचे निकाल १०० टक्के लागले. शिवाय काही शाळांमध्ये तर ५० हून अधिक विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. सेंटर पॉईन्ट स्कूल (काटोल मार्ग), नारायणा विद्यालयम्, सेंटर पॉईन्ट स्कूल (अमरावती मार्ग), भवन्स बी.पी. विद्यामंदिर (सिव्हील लाईन्स), भवन्स बी.पी. विद्यामंदिर (श्रीकृष्णनगर), मॉडर्न स्कूल (कोराडी मार्ग), सेंट पॉल हायस्कूल या शाळांच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरीत आघाडी घेतली.

‘टॉपर्स’चा योगायोग
मागील वर्षी अव्वल क्रमांकावर असलेल्या विद्यार्थिनीला ९९.४ टक्केच गुण प्राप्त झाले होते. यंदादेखील पहिल्या क्रमांकावर आलेल्या ओजसला तेवढेच गुण आहेत. २०१८ मध्ये ‘टॉपर’ला ९८.६ टक्के होते.

‘कोरोना’मुळे शाळांत ‘सेलिब्रेशन’ नाही
एरवी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून शाळांमध्ये जोरदार ‘सेलिब्रेशन’चे चित्र असते. शाळांमध्येदेखील विद्यार्थी लगेच धाव घेतात. मात्र यंदा ‘कोरोना’चा प्रकोप असल्याने शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याची सूचना दिली होती. शिवाय रेस्टॉरंट्सदेखील बंद असल्याने विद्यार्थ्यांना एकत्रित ‘सेलिब्रेशन’ करता आले नाही. काही शाळांमध्ये तुरळक प्रमाणात विद्यार्थी आले होते. मात्र शाळा व्यवस्थापनांनी त्यांना परत जाण्याची सूचना केली.

पहिल्या पाच क्रमांकावर १९ जण
शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पहिल्या पाच क्रमांकावर चक्क १९ विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश आहे. चौथ्या क्रमांकावर ९८.८ टक्के गुण घेणारे पाच तर पाचव्या क्रमांकावर ९८.६ टक्के गुण घेणारे ११ विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत.

Web Title: CBSE 10th results announced: Girls win in 'Toppers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.