४७ डिग्री तापमानात नागपुरात सीबीएसईच्या शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 09:32 PM2019-06-03T21:32:59+5:302019-06-03T21:34:28+5:30
नागपूरसह विदर्भातील तापमान लक्षात घेता, २६ जूनपासून शाळा सुरू व्हाव्यात, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहे. पण या आदेशाकडे सीबीएसईच्या शाळा पुरत्या दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान ४७ डिग्रीवर असताना, काही सीबीएसई शाळा सुरू झाल्या आहेत. दुपारी १२.३० वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवून, सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशच मानत नाही, असे दाखवूनच दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह विदर्भातील तापमान लक्षात घेता, २६ जूनपासून शाळा सुरू व्हाव्यात, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहे. पण या आदेशाकडे सीबीएसईच्या शाळा पुरत्या दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान ४७ डिग्रीवर असताना, काही सीबीएसई शाळा सुरू झाल्या आहेत. दुपारी १२.३० वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवून, सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशच मानत नाही, असे दाखवूनच दिले आहे.
गेल्या आठवडाभरापासून नागपुरात सातत्याने तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर जात आहे. दररोज उष्माघाताने मरणाऱ्यांची संख्या वाढते आहे. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा इतका असतो की बाहेर पडणे कठीण झाले आहे. नागपूरकरांनी एकप्रकारे उन्हाचा धसकाच घेतला आहे. अशा वातावरणात सीबीएसई शाळेच्या व्यवस्थापनाने शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविले आहे. सोमवारी पूर्व नागपुरातील सीबीएसई बोर्डाच्या एका प्रसिद्ध शाळेने ८ ते १० वर्ग सुरू केले. सकाळी ७ ते दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान शाळा सुरू होती. पण जिल्हा प्रशासनाने एकीकडे शाळा २६ जूननंतर सुरू करण्याचे निर्देश दिले असताना, ३ जूनपासून शाळा कशी सुरू झाली, यावर पालकांनीही आक्षेप घेतला. पण शाळा व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयामुळे पालकांनी विनातक्रार मुलांना शाळेत पाठविले. शाळा संपल्यानंतर भर दुपारी विद्यार्थी खांद्यावर दप्तराचे ओझे घेऊन उन्हात घरी परतले. उन्हाच्या तडाख्यामुळे प्रत्येक जण हैराण असताना, या विद्यार्थ्यांची अवस्था केविलवाणी झाली होती.
सीबीएसई शाळांच्या बाबतीत शिक्षण विभाग उदासीन
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही सीबीएसईच्या शाळा ३ जूनपासून कशा सुरू झाल्या, यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, चौकशी करावी लागेल. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनाही अवगत केल्यानंतर त्या शाळेचा सीबीएसईच्या संदर्भातील टाइमटेबल बघावा लागेल, असे सांगितले. सीबीएसई शाळेच्या अशा हेकेखोर भूमिकेवर शिक्षण विभागाकडून बघ्याची भूमिका घेतली जाते आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होत असताना, बघावं लागेल, चौकशी करावी लागेल, असे वक्तव्य प्रशासनाकडून अनपेक्षित आहे.