एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिलीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 08:20 PM2019-09-23T20:20:36+5:302019-09-23T20:22:55+5:30
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक सोसायटी नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक सोसायटी नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. २०१९-२० या वर्षात २५ एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिलीपासून वर्ग सुरूकरण्यात येणार असल्याने प्रत्येक वर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देणे शक्य होणार आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर एकलव्य निवासी शाळा सुरू केल्या. २००१ ते २०१९ पर्यंत २५ एकलव्य निवासी शाळा सुरूअसून इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) या अभ्यासक्रमाचे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण देण्यात येते. यात विद्यार्थ्यांना भोजन, निवास व्यवस्था, वह्या पुस्तके, गणवेश, लेखन साहित्य शासनामार्फत मोफत पुरवण्यात येते. नाशिक, नागपूर, अमरावती, पालघर, गडचिरोली, नंदुरबार, गोंदिया, धुळे, नांदेड, ठाणे, चंद्रपूर, यवतमाळ, अहमदनगर या ठिकाणी एकलव्य निवासी शाळा सुरू आहेत. इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा कल असलेले अनेक विद्यार्थी इयत्ता सहावीपासून एकलव्य निवासी शाळेत प्रवेश घेतात. मात्र पहिलीपासून मराठी माध्यमात शिक्षण झाल्यावर या विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेत सीबीएसई अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश देत असल्याने त्यांना भाषेची अडचण येते. आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा आणि या विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर व्हावी या उद्देशाने एकलव्य निवासी शाळेत पहिलीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. इयत्ता पहिलीपासून उत्तम दर्जाचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याने अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे.
विदर्भातील एकलव्य शाळा
चिखलदरा, जि. अमरावती
खैरी परसोडा, ता. रामटेक, जि. नागपूर
बोरगाव, ता. देवरी, जि. गोंदिया
तुमरगुंडा(अहेरी), जि. गडचिरोली
देवाडा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर
चामोर्शी, जि. गडचिरोली
पांढरकवडा, जि. यवतमाळ
गेवर्धा, कुरखेडा, जि. गडचिरोली