‘सीसीआय’ची खुल्या बाजारात कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 08:00 AM2022-12-16T08:00:00+5:302022-12-16T08:00:06+5:30

Nagpur News सीसीआय (काॅटन कार्पाेरेशन ऑफ इंडिया) ने सन २०२० नंतर चालू हंगामात (सन २०२२-२३) कापूस खरेदीचा निर्णय घेत गुरुवारी (दि. १५) देशाभरात चार खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात केली आहे.

CCI's purchase of cotton in the open market | ‘सीसीआय’ची खुल्या बाजारात कापूस खरेदी

‘सीसीआय’ची खुल्या बाजारात कापूस खरेदी

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात चार खरेदी केंद्र सुरू

सुनील चरपे
नागपूर : सीसीआय (काॅटन कार्पाेरेशन ऑफ इंडिया) ने सन २०२० नंतर चालू हंगामात (सन २०२२-२३) कापूस खरेदीचा निर्णय घेत गुरुवारी (दि. १५) देशाभरात चार खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र आणि ओडिशात प्रत्येकी दाेन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. खरेदी केंद्र वाढणार असून, या केंद्रांवर खुल्या बाजारातील दरानुसार कापूस खरेदी केली जाणार असल्याचे सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सीसीआयने गुरुवारी महाराष्ट्रातील गेवराई (जिल्हा बीड) व बदनापूर (जिल्हा जालना) आणि ओडिशातील रायगडा जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. या केंद्रावर कापसाची नियमित आवक आणि दर्जावर विशेष भर देत बाजारभावाप्रमाणे कापूस खरेदी केली जाणार आहे. गरजेनुसार खरेदी केंद्र वाढविले जाईल, असेही सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीसीआयने गेवराई व बदनापूर येथील खरेदी केंद्रावर प्रति क्विंटल ८,४०० रुपये दराने कापसाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. या केंद्रावर पहिल्या दिवशी कापसाची आवक कमी हाेती, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. सीसीआयची कापूस खरेदी ही बाजार समितीच्या प्रति शेकडा शुल्क आकारणीवर अवलंबून असेल.

तर दर काेसळतील
जागतिक बाजारात गुरुवारी रुईचे दर ९९.४ सेंट प्रति पाउंडपर्यंत खाली आले. देशांतर्गत बाजारात सरकीचे दर कमी झाल्याने कापसाचे दर ४०० ते ७०० रुपये प्रति क्विंटलने उतरले आहे. सीसीआयने जर कमी दरात कापूस खरेदी केला आणि आपण किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक दराने कापूस खरेदी करीत आहाेत, असा तर्क दिला तर कापसाचे दर काेसळतील.

तर दर वधारतील

मागील वर्षी कापसाच्या ४६ लाख गाठींची निर्यात केली होती. तेवढीच निर्यात यावर्षीही करण्याची घोषणा केंद्र सरकारने सीसीआयच्या माध्यमातून करावी. कापूस निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने सीसीआयला सबसिडी जाहीर करावी. त्यामुळे कापसाचा शिल्लक साठा कमी हाेईल. यातून व्यापाऱ्यांना कापसाचे दर पाडणे शक्य हाेणार नाही.

शेतकऱ्यांना अधिकाधिक दर मिळावा, यासाठी सीसीआय प्रयत्नशील आहे. सध्या दाेन केंद्र सुरू केले आहेत. आणखी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
- अर्जुन दवे, उपमहाप्रबंधक,

सीसीआय, औरंगाबाद.

 

शेतकऱ्यांना ९ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दरात कापूस विकणे परवडत नाही. सीसीआयने सी-टू अधिक ५० टक्के नफा या दराने शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी करावी. तशी केंद्र सरकारने घाेषणा करावी.
- विजय जावंधिया, 

शेतकरी संघटना.
 

सीसीआय बाजारात उतरल्याने शेतकऱ्यांना फायदा हाेईल. स्पर्धेमुळे कापसाच्या दरात वाढ हाेऊ शकते. सीसीआयने स्पर्धेत उतरून कापसाची खरेदी करावी.
- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक,

कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र.

Web Title: CCI's purchase of cotton in the open market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस