नागपुरातील सीसीटीव्ही कंट्रोल रूम हाँगकाँगच्या धर्तीवर
By admin | Published: January 14, 2016 03:48 AM2016-01-14T03:48:08+5:302016-01-14T03:48:08+5:30
नागपूर शहर हे सीसीटीव्ही सर्व्हिलन्सअंतर्गत आणण्यात येत आहे. त्यासाठी शहरात ७०१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
७०१ लोकेशन निश्चित : पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांची माहिती
नागपूर : नागपूर शहर हे सीसीटीव्ही सर्व्हिलन्सअंतर्गत आणण्यात येत आहे. त्यासाठी शहरात ७०१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. संपूर्ण शहरावर लक्ष ठेवणाऱ्या या सीसीटीव्हीचे एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) राहील. नागपुरातील सीसीटीव्ही कंट्रोल रूम पुणे आणि मुंबईपेक्षा अत्याधुनिक राहणार असून हाँगकाँगच्या धर्तीवर तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी बुधवारी पोलीस जिमखाना येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यादव यांनी सांगितले की, नागपूर हे स्मार्ट शहर होत आहे. कुठलेही शहर हे तेव्हाच स्मार्ट होऊ शकेल जेव्हा ते सुरक्षित असेल. त्यामुळे शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक भर देत आहेत. याअंतर्गत सीसीटीव्ही सर्व्हिलन्सचा वापर केला जात आहे. पुणे शहर हे संपूर्ण सीसीटीव्ही देखरेखेखाली आले आहे. मुंबईतील एक डिव्हिजन सीसीटीव्हीअंतर्गत आले आहे. नागपूर शहरसुद्धा सीसीटीव्ही सर्व्हिलन्सअंतर्गत येत आहे. त्यादिशेने पोलीस कामाला लागले आहेत. ७०१ ठिकाणे निश्तिच करण्यात आली आहेत. या ठिकाणी तीन प्रकारचे कॅमेरे लावण्यात येतील. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर लक्ष ठेवता येणे शक्य होईल. लवकरच निविदा काढण्यात येईल. या संपूर्ण कामाला किमान एक वर्ष लागेल, असेही त्यांनी सांगितले.
यासोबतच सायबर सेल व नियंत्रण कक्षालाही आधुनिकीकरण करण्याची योजना आहे. पत्रपरिषदेला पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त संजय लाटकर, पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार, पोलीस उपायुक्त ईशू सिंधू, पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, पोलीस उपायुक्त संजय लाटकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)