राज्यभरातील दारू दुकानांमध्ये लागणार सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 09:14 PM2017-11-18T21:14:20+5:302017-11-18T21:22:03+5:30
राज्यातील परवानाधारक दारू दुकाने व बार परमीट रुममध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उत्पादक शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी रविभवन येथे आयोजित एका बैठकीत सांगितले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यातील परवानाधारक दारू दुकाने व बार परमीट रुममध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उत्पादक शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी रविभवन येथे आयोजित एका बैठकीत सांगितले.
ग्रामीण भागात दारूदुकाने सकाळी ६ पासून रात्री उशिरापर्यंत सुरूअसतात, अशी तक्रार उत्पादन शुल्क मंत्र्यांकडे आली. रस्त्यांच्या कडेला देशी दारू विक्रीच्या दुकानांवरून वैध-अवैध दारूची विक्री सुरू असताना या दुकानांसमोर अंडेवाले व अन्य खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी याची कसून तपासणी करावी. परवाधारक दुकानदारही अवेळी दुकाने सुरूठेवून विक्री करीत असल्याच्या तक्रारी असून त्यावर अधीक्षकांनी स्वत: तपासणी करून कारवाई करावी. प्रसंगी परवाना निलंबित करण्याची कारवाईही करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. अधिकाऱ्यांनी दररोज १० दुकानांची तपासणी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
जिल्ह्यात १२ वॉटर फिल्टर प्लान्ट
जिल्ह्यात १२ अल्ट्रा वॉटर फिल्टर प्लान्ट लावण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी शनिवारी दिल्या. या कामासाठी निविदा सूचना काढाव्यात व आमदार निधीतून हे १२ वॉटर फिल्टर प्लान्ट घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
हुडकेश्वर नरसाळा विकास आराखडा
नगर रचना विभागाने हुडकेश्वर नरसाळा भागाचा विकास आराखडा स्थायी समितीच्या सहा सदस्यांकडे पाठविला आहे. समितीचा अहवाल अजून यायचा आहे. हा अहवाल आल्यानंतर त्यात जुजबी सुधारणा असल्यास त्या करून मनपा सभागृहाकडे हा विकास आराखडा पाठवला जाईल व नंतर शासनाच्या मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला जाईल. महादुला कामठी विकास आराखड्यासाठी सहा जणांची समिती गठित करण्याचे पत्र पुण्याच्या संचालकांना नगर विकास विभागाने पाठविले आहे. मौदा आराखड्यासाठी नागरिकांच्या आक्षेप आणि हरकतींवर सुनावणी झाली आहे. मौदा नगर परिषदेने आराखडा मंजूर केल्यानंतर तो शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली.