नागपूर शहरातील प्रत्येक फार्मसी दुकानात सीसीटीव्ही अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 09:31 PM2022-11-03T21:31:38+5:302022-11-03T21:32:50+5:30
Nagpur News शहरातील सर्व औषध दुकानांमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचे पालन न करणाऱ्या दुकानांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे.
नागपूर : नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात केली असून, आता शहरातील औषधांच्या दुकानांवर ‘वॉच’ राहणार आहे. विना प्रिस्क्रिप्शन विशिष्ट औषधे विकणाऱ्या दुकानदारांचा शोध सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील सर्व औषध दुकानांमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचे पालन न करणाऱ्या दुकानांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. अल्प्राझोलमसारख्या काही औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’शिवाय करता येत नाही. मात्र, कुठल्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय काही दुकानदार औषधांची विक्री करतात. यासंदर्भात पोलीस विभागाने अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभागासह प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अमली पदार्थांच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेंतर्गत औषध दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधांवर देखरेख केली जाईल. अशी औषधे देताना औषध दुकानदार प्रिस्क्रिप्शनवर स्टॅंप व विकल्या जाणाऱ्या गोळ्यांची संख्या लिहितो आहे की नाही, याचीदेखील तपासणी करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. यासंदर्भात शहरातील २५ वितरकांची यादीदेखील तयार करण्यात आली असून, त्यांना ही सूचना देण्यात आली आहे.
व्यसनमुक्तीसाठी ‘सीएसआर’मधून फंड जमविणार
अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी पोलिसांकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. शहरातील १३ व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये त्यांच्यावर उपचार व्हावेत व त्यांचे समुपदेशन व्हावे, अशी व्यवस्था तयार करण्यात येत आहे. यासाठी वेळ पडली तर ‘सीएसआर’, स्वयंसेवी संस्था किंवा ‘डीपीसी’च्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. प्रत्येक उपायुक्ताने कमीत कमी १० जणांना अशा पद्धतीने व्यसनमुक्त करावे, असे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे.
‘नार्को फ्लशआऊट’ मोहिमेंतर्गत ४४ गुन्हे
ऑक्टोबर महिन्यात नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’ ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत विविध शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील २०० अवैध पानठेले बंद केले आहेत. ‘कोप्टा’ कायद्यांतर्गत १ हजार १३८ गुन्हे दाखल झाले असून, ‘एनडीपीएस’अंतर्गत ४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील तीन ते चार वर्षांत ‘एनडीपीएस’अंतर्गत गुन्हे दाखल झालेल्या १ हजार ११० आरोपींपैकी ९२१ जणांची झाडाझडती घेण्यात आली आहे.