शहरातील प्रत्येक फार्मसी दुकानात सीसीटीव्ही अनिवार्य, १० तारखेपर्यंतची मुदत, अन्यथा परवाना निलंबित करणार
By योगेश पांडे | Published: November 3, 2022 09:36 PM2022-11-03T21:36:27+5:302022-11-03T21:36:45+5:30
CCTV: नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली असून आता शहरातील औषधांच्या दुकानांवर ‘वॉच’ राहणार आहे. विना प्रिस्क्रिप्शन विशिष्ट औषधे विकणाऱ्या दुकानदारांचा शोध सुरू झाला आहे.
- योगेश पांडे
नागपूर : नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली असून आता शहरातील औषधांच्या दुकानांवर ‘वॉच’ राहणार आहे. विना प्रिस्क्रिप्शन विशिष्ट औषधे विकणाऱ्या दुकानदारांचा शोध सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील सर्व औषधी दुकानांमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचे पालन न करणाऱ्या दुकानांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. अल्प्राझोलमसारख्या काही औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या ‘प्रिस्क्रीप्शन’शिवाय करता येत नाही. मात्र कुठल्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय काही दुकानदार औषधांची विक्री करतात. यासंदर्भात पोलीस विभागाने अन्न व औषधी प्रशासन, आरोग्य विभागासह प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अंमली पदार्थांच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहीमेअंतर्गत औषधी दुकानांत विकल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधांवर देखरेख केली जाईल. अशी औषधे देताना औषधी दुकानदार प्रिस्क्रिप्शनवर स्टॅंप व विकल्या जाणाऱ्या गोळ्यांची संख्या लिहीतो आहे की नाही याचीदेखील तपासणी करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. यासंदर्भात शहरातील २५ वितरकांची यादीदेखील तयार करण्यात आली असून त्यांना या सूचना देण्यात आली आहे.