अवैध रेती वाहतुकीवर आता सीसीटीव्हीने नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:54 PM2020-06-15T23:54:40+5:302020-06-15T23:56:49+5:30
अवैध रेती वाहतुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून महसूल, पोलीस व परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने याबाबत कडक कारवाई करावी. सर्व टोलनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे रेतीच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवैध रेती वाहतुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून महसूल, पोलीस व परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने याबाबत कडक कारवाई करावी. सर्व टोलनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे रेतीच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. कारवाई करीत असताना केवळ दंड आकारून न थांबता वाहन जप्त करावे, असेही त्यांनी सांगितले.
नागपूर विभागात अवैध रेती वाहतुकीच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्र्यांनी उपरोक्त निर्देश दिले. यावेळी ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे नितीन राऊत, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आ.आशिष जैयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला व उपायुक्त महसूल सुधाकर तेलंग उपस्थित होते. या प्रकरणी समाविष्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करावी. भिवापूर ते उमरेड दरम्यान निलज फाटा या ठिकाणी तपासणी नाका उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
रेतीघाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावा
ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठकीत रेतीबाबत तेलंगणा मॉडेलचा अभ्यास करण्याची सूचना केली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गौण खनिज नियंत्रण समिती प्रत्येक उपविभागात आहे. ही समिती सक्रिय होण्याची आवश्यकता असून तिच्या नियमित बैठका व्हाव्या. नागपूर जिल्ह्यातील खापा, वडेगाव आणि सावंगी रेती घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. तसेच राऊत आणि वडेट्टीवार यांनी निलज फाटा ते पवनी दरम्यान तपासणी नाका उभारण्याची मागणी केली.
२,१२१ प्रकरणात २०.५२ कोटीचा दंड वसूल
नागपूर विभागात १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०२० दरम्यान अवैध उत्खनन वाहतुकीच्या २१२१ प्रकरणात २० कोटी ५२ लाखाचा दंड वसूल करण्यात आला. याप्रकरणी १७७ गुन्हे दाखल करण्यात आले असून १०२ लोकांना अटक करण्यात आली. रेतीघाट लिलावासंबंधी भंडारा जिल्हा वगळता नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा जिल्ह्यात जनसुनावणी घेण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. भंडाऱ्यातील जनसुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीत नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.