सीसीटीव्हीचा ‘वॉच’, तरी दुकानातून ४.२१ लाखांच्या सीसीटीव्हीची चोरी
By योगेश पांडे | Published: April 21, 2023 06:32 PM2023-04-21T18:32:23+5:302023-04-21T18:32:43+5:30
चोर तसेच समाजकंटकांवर वॉच रहावा यादृष्टीने सुरक्षेची उपाययोजना म्हणून घर, दुकानांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येतात.
नागपूर : चोर तसेच समाजकंटकांवर वॉच रहावा यादृष्टीने सुरक्षेची उपाययोजना म्हणून घर, दुकानांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येतात. मात्र चोरट्यांनी नागपुरात चक्क सीसीटीव्हीच्या दुकानालाच टार्गेट केले व ४.२१ लाखांचे सीसीटीव्ही व इतर साहित्य चोरून नेले. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नंदकिशोर शालिकराम तिवारी (४६.) यांचे रजत प्लाझा कॉम्प्लेक्स, घाट रोड येथे पायोनिअर कॉम्प्युटर सीसीटीव्हीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात संगणकासह सीसीटीव्हीचीदेखील विक्री होते. १९ एप्रिल रोजी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले. रात्री अज्ञात चोरट्याने बनावट चाबीने दुकानाचे कुलूप उघडले व आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर असा ४.२१ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. तिवारी यांना दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याचे कळाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चोरी पाळतीवर असलेल्या किंवा परिचयातीलच व्यक्तीने केल्याचा पोलिसांना संशय आहे.