गुन्हा दाखल झाल्याने सीडीपीओ, पुरवठादार अडचणीत; अंगणवाडी साहित्य घोटाळा
By गणेश हुड | Published: June 3, 2024 07:41 PM2024-06-03T19:41:13+5:302024-06-03T19:41:22+5:30
विभागप्रमुखांची चिंता वाढली
नागपूर : अंगणवाडी श्रेणिवर्धन योजनेच्या निधीतून जिल्ह्यातील अंगणवाड्यांना साहित्य वाटपात घोटाळा झाला आहे. या प्रकरणात सर्व १३ सीडीपीओ यांच्या विरोधात पंचायत समिती स्तरावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे सीडीपीओ यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभाग प्रमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत.
साहित्य घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी अहवालात सीडीपीओ, पुरवठादार व विभाग प्रमुखांवर ठपका ठेवून दोषीकडून रक्कम वसुलीची शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दिली आहे. प्रशासनाचे पत्र आणि चौकशी समितीच्या अहवालानुसार सीडीपीओ यांच्या विरोधात स्थानिक पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाने बीडीओंना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १३ सीडीपीओंवर भादंविच्या विविध कलमान्वये पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिसांनी सीडीपीओ व पुरवठादारांवर भादंविच्या कलम ४२०, ४०९, १२० (ब) अन्वये गुन्हे दाखल केले आहे. अंगणवाडी श्रेणिवर्धन योजने अंतर्गत अंगणवाड्यांमध्ये साहित्याचा पुरवठा करण्यासाठी दोन टप्प्यांत एक कोटी सहा लाखांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला होता. हा निधी केंद्र शासनाचा होता. सर्व निधी पंचायत समितीस्तरावरील सीडीपीओंच्या खात्यात वळता करण्यात आला. ४९ अंगणवाड्यांमध्ये हे साहित्य पुरविण्यात आले. साहित्य अंगणवाडीत पोहोचण्यापूर्वीच पुरवठादाराला बिले अदा करण्यात आल्याचा आरोप उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी केला होता. त्यानंतर प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली.
विभाग प्रमुखांची चिंता वाढली
या प्रकरणात अटक झाली व ४८ तासात जामीन न मिळाल्यास सीडीपीओ यांच्यावर निलंबन कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या प्रकरणात विभाग प्रमुखांवरही ठपका असल्याने त्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. यासंदर्भात प्रशासन काय भूमिका घेते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.