‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत दुर्घटना; सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'एमआय १७ व्ही ५' च्या अपघातामुळे तज्ज्ञांनाही बसला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 07:00 AM2021-12-09T07:00:00+5:302021-12-09T07:00:11+5:30
Nagpur News व्हीव्हीआयपी व व्हीआयपी मान्यवरांसाठी वापरण्यात येणाऱ्या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरची प्रत्येक उड्डाणाअगोदर तपासणी होते. सर्वोत्कृष्ट व विशेष प्रशिक्षित वैमानिक असतानादेखील अशाप्रकारे अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
योगेश पांडे
नागपूर : ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांचा कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर क्रॅशमुळे मृत्यू झाल्यानंतर तांत्रिक बिघाडाची शक्यता वायुदलाकडून तपासण्यात येत आहे. या अपघाताचे नेमके कारण ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’तून समोर येईलच, परंतु देशातील सुरक्षित हेलिकॉप्टरचा अशाप्रकारे अपघात झाल्याने वायुदलातील अधिकारी व तज्ज्ञांनादेखील धक्का बसला आहे. व्हीव्हीआयपी व व्हीआयपी मान्यवरांसाठी वापरण्यात येणाऱ्या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरची प्रत्येक उड्डाणाअगोदर तपासणी होते. सर्वोत्कृष्ट व विशेष प्रशिक्षित वैमानिक असतानादेखील अशाप्रकारे अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वसाधारणत: एमआय १७ व्ही ५ हे हेलिकॉप्टर व्हीव्हीआयपी व व्हीआयपी मान्यवरांसाठी वापरण्यात येते. रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरमध्ये दोन इंजिन असतात. या हेलिकॉप्टरसाठी उत्कृष्ट वैमानिकांची निवड होते व त्यांना अत्युच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. या हेलिकॉप्टरची प्रत्येक उड्डाणाअगोदर बारीक तपासणी होते. त्यासाठीदेखील वायुदलातील उत्कृष्ट कर्मचारी निवडण्यात येतात व त्यांच्याकडे मेंटेनन्सची जबाबदारी असते.
आपत्कालीन स्थितीसाठी विशेष प्रशिक्षण
इंजिन खराब झाले किंवा आपत्कालीन स्थिती आली तर सुरक्षित लॅन्डिंग करण्याबाबत एमआय १७ व्ही ५ च्या वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. त्याचा सरावदेखील होतो. वेळ कमी असताना प्रवाशांना कसे वाचवायचे, यात हे वैमानिक निपुण असतात. त्यांचे प्रशिक्षण मास्टर ग्रीन दर्जाचे असते. जर थोडी कल्पना आली असती व जवळपास मैदानी भाग असता तर त्यांनी लगेच हेलिकॉप्टर उतरविले असते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
हिमालयातदेखील नियमित उपयोग
भारतीय वायुदलाकडून एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरचा हिमालयातील कठीण प्रदेशातदेखील सातत्याने उपयोग होतो. उंचीवर उडू शकणारे हे हेलिकॉप्टर असून उड्डाणाअगोदर या हेलिकॉप्टरची निश्चितच पूर्ण तपासणी झाली असेल, ही बाब मी ठामपमे सांगू शकतो. वायुदलात असताना माझ्याकडे ही जबाबदारी होती. या हेलिकॉप्टरची क्षमता २० हून अधिक प्रवाशांची होती. त्यामुळे वजन जास्त झाल्याची शक्यता नाही. वेलिंग्टनहून कुन्नूरमधील उड्डाणाचा वेळ जास्त नव्हता. पहाडात हे हेलिकॉप्टर कोसळले, यातील इंधनाची ज्वलनशक्ती जास्त असते व त्यामुळे आग लागण्याची शक्यता आहे. हे हेलिकॉप्टर अत्यंत सुरक्षित असले तरी शेवटी ते यंत्र आहे. आता याचा नेमका अपघात का झाला हे ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’तूनच स्पष्ट होईल, असे प्रतिपादन एअर व्हाईस मार्शल (सेवानिवृत्त) सूर्यकांत चाफेकर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
हेलिकॉप्टरची विशेषता
- रशियन बनावटीचे हेलिकॉप्टर.
- तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक हेलिकॉप्टर्समध्ये होते गणना.
- १२ हजार किलोहून अधिक वजन वाहून नेण्याची क्षमता.
- अत्युच्च दर्जाची नेव्हीगेशन प्रणाली
- कॉकपीटच्या सुरक्षेसाठी आर्मर्ड प्लेट्सचा उपयोग
- खराब वातावरणातदेखील उड्डाणाची क्षमता
- २५० किमी प्रति तास या वेगाने उड्डाणाची क्षमता