‘इग्नू’चा वर्धापनदिन उत्साहात
By admin | Published: September 13, 2015 03:03 AM2015-09-13T03:03:08+5:302015-09-13T03:03:08+5:30
‘इग्नू’च्या(इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) विभागीय केंद्राचा सहावा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी संपन्न झाला.
नागपूर : ‘इग्नू’च्या(इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) विभागीय केंद्राचा सहावा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणाऱ्या ‘इग्नू’मुळे नागरिकांना स्वत:च्या पायावर उभे राहता येतेच शिवाय त्यांच्यातील आत्मविश्वासदेखील वाढीस लागला आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत ज्ञानरूपी सागर पोहोचविणाऱ्या ‘इग्नू’ची भूमिका द्रोणाचार्यांसारखीच असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
‘इग्नू’च्या प्रादेशिक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी ‘ज्ञान गंगा-सर्वधर्मासाठी शिक्षण’ अशी संकल्पना ठेवण्यात आली होती. यावेळी ‘इग्नू’च्या विभागीय केंद्राचे संचालक डॉ.पी.शिवस्वरुप हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ‘इग्नू’च्या विद्यार्थ्यांनाच प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते.
डॉ. शिवस्वरुप यांनी सुरुवातीला केंद्राच्या वर्षभरातील कामगिरीचा अहवाल सादर केला. फक्त सहा वर्षांआधी उभारणी करण्यात आलेल्या इग्नू संस्थानाने मोठी भरारी मारली आहे. इग्नूचे नागपूर केंद्र सुरू झाल्यापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याचे कार्य करण्यात आले. आतापर्यंत ५९९ कैद्यांना याचा लाभ झाला आहे. सोबतच कुरखेडा-गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी भागामध्ये ६४७ जण ‘इग्नू’चे विद्यार्थी झाले. गडचिरोलीतील महिलांना शिक्षणाच्या आधारे स्वावलंबी करणे, वारांगनांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे असे अनेक कार्य संस्थेच्यावतीने होत आहेत. जनतेशी जुळून काम करणे हेच आमचे ध्येय असल्याचे मतही डॉ. पी. शिवस्वरूप यांनी व्यक्त केले.
यावेळी शिक्षणासाठी ‘इग्नू’सोबत जुळलेल्या सकीना बनवानीवाला, अमृता शिरपूरकर, सिस्टर सिल्वी, दिलनार नोशिल रंदेलिया, जमशेदसिंह कपूर, ज्ञानविकास चकमा, फादर विल्सन अब्राहम, प्रा.एस.पी.संगल यांनी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शक्ती शर्मा यांनी केले तर डॉ.रश्मी बत्रा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)