नवकार मंत्राचा जप करून जन्म कल्याणक महोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:00 AM2020-04-07T06:00:00+5:302020-04-07T06:00:06+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही धार्मिक उत्सवाचे आयोजन न करता श्रद्धाळूंनी आपापल्या घरी नवकार मंत्राचा जप आणि सामयिक अनुष्ठान करून भगवंताचे अभिवादन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही धार्मिक उत्सवाचे आयोजन न करता श्रद्धाळूंनी आपापल्या घरी नवकार मंत्राचा जप आणि सामयिक अनुष्ठान करून भगवंताचे अभिवादन करण्यात आले. भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती, पश्चिम नागपूरतर्फे भाविकांना घरोघरी नवकार मंत्राचे जप करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जैन समाजाच्या अनुयायांनी त्यांच्या घरीच भगवान महावीर यांची आराधना केली. समितीचे संयोजक पवन खाबिया यांनी सांगितले, दरवर्षी भगवंताच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त समितीच्या वतीने रक्तदान शिबिर, भोजनदान, अहिंसा स्कूटर रॅली, भक्तिसंध्या तसेच आबालवृद्धांचा सहभाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र जगभरासह आपल्या देशातही कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. सामाजिक अंतर राखणे महत्त्वाचे असल्याने समितीने जन्म कल्याणकाचे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली. भाविकांना आपल्या घरीच सकाळी ९ ते १० वाजता नवकार मंत्राचा जप करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे खाबिया यांनी सांगितले. यात श्वेतांबर जैन समाज पश्चिम नागपूर, सुमतीनाथ महिला मंडळ, अरिहंत मंडळ, पश्चिम नागपूर महिला मंडळ, शासन सेविका मंडळ, जैन सूर सरगम मंडळ, जैन सहेली मंडळ, अरिहंत टच, महावीर इंटरनॅशनल, जैन-१५, जीटो नागपूर, बीजेएस नागपूर सेंट्रल, गुरुभक्त सेवा समिती व इतर संस्थांचे सहकार्य होते. कोर कमिटीचे कांतिलाल झामड, निखिल कुसुमगर, विक्रम शाह, राजेंद्र लोढा, प्रफुल्ल जैन, उमेश भंसाली, आनंद ओस्तावाल, महादेव सिंघी, मानक चंद सेठिया, पीयूष फतेहपुरिया आदींची महत्त्वाची भमिका आहे.